राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

राज ठाकरे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अमुक एक खालच्या जातीचा, तमुक एक वरच्या जातीचा हे कुणी ठरवले? ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या शिवछत्रपतींचे नाव घेऊन निव्वळ मतांसाठी देशात अन् राज्यात जातिभेदाचे राजकारण सुरू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर घणाघात केला. तसेच यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी हिंदुत्वासह मराठीच्या मुद्दद्यालाही स्पर्श केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आयोजित सभेत राज्यभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर ताशेरे ओढले. सध्या राज्यात नोकरी अन् शिक्षणाचा प्रश्न आहे. बाहेरच्या राज्यांतील लोक आम्ही पोसायची अन् आमचे लोक आंदोलने करीत फिरणार? प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. मात्र, जाती-जातींत विष कालवून तुमची मते कशी विभागली जातील, हे एकमेव धोरण राजकारण्यांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राची माती होत असून, यांच्या विश्वासालाही तडा गेला आहे. त्यामुळे बाकीच्यांनी जो विश्वास घालवलाय, तो विश्वास आपल्याला जिंकायचा आहे. ‘जे जे माझ्यासाठी शक्य असेल, ते या मराठी माणसासाठी आणि हिंदूसाठी करेन’, अशी शपथ घेण्याचे आवाहन राज यांनी उपस्थितांना केले. तसेच जातीपातीशिवाय आपल्याला महाराष्ट्र उभा करायचाय, पक्षातही जातपात करायची नसल्याचेही त्यांनी पदाधिकारी, कार्यकत्यांना सांगितले.

पक्षाच्या १८ वर्षांच्या प्रवासाविषयी राज म्हणाले, मी या काळात चढ कमी आणि उतारच जास्त पाहिले. पण या सर्व काळात तुम्ही माझ्यासोबत होतात. यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणारच. पण पेशन्स ठेवा. तो नसेल, तर कुठेतरी घरंगळत जाणारच. मला भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलेन. माझ्यासकट अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला. सुरुवात करतात शेवट करत नाहीत, असा आरोप आपल्यावर केला जातो. मात्र, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही?, पंतप्रधान फुले वाहून गेले, त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर मात्र ही मंडळी देणार नाहीत. मनसेमुळे मोबाइलवर मराठी ऐकू येऊ लागले. ६२ ते ६७ , टोलनाके बंद झाले. आमची भूमिका स्वच्छ आहे. मुंबई-गोवा रस्ता, मुंबई-नाशिक रस्ता चे भीषण आहे आणि तुम्ही टोल घेता? असाही प्रश्न ले त्यांनी उपस्थित केला. आम्ही वारंवार सिद्ध करून दाखवले, समर्पक उत्तरे दिलीत, तरी माध्यमांमधून ‘आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो’ हा अपप्रचार केला गेला. पण मग शिवस्मारकाचे काय झाले? त्रासदायक भोंगे बंदी होणार होती, त्याचे काय झाले? भोंगे आंदोलनात उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७ हजार सहकाऱ्यांवर खटले भरले, असा काय गुन्हा होता त्या मुलांचा? आता कोणताच नेता त्याबद्दल बोलत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. मला भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत पण त्या ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणुकांचे निर्णय घेऊच, संयम ठेवा असा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्लाही दिला. याप्रसंगी मनविसे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, शिरीष सावंत, नरेश सातपुते, अभिजित पानसरे, शालिनी ठाकरे, रेखा गुप्ता, लोकसभा संघटक ॲड. किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, ॲड. रतनकुमार इचम, सलीम शेख, पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, योगेश शेवरे, सुजाता डेरे, संदीप भवर, मनोज घोडके आदी उपस्थित होते.

भाजपवर निशाणा
माझ्या कडेवर मला माझी पोरं खेळवायची आहेत. पण महाराष्ट्रात दुसऱ्यांची पोरं कडेवर खेळविली जात असल्याचे सांगत राज यांनी भाजपवर निशाणा साधला. मला दुसऱ्यांची पोरं नको, माझी पोरं मोठी करण्याची ताकद माझ्यात असल्याचे सांगत राज यांनी कार्यकर्त्यांमध्ये हुरूप भरण्याचा प्रयत्न केला.

यश मोदींचे नव्हे, कार्यकर्त्यांचे
राजकारणात प्रचंड संयम लागतो. आज मोदींच्या रूपात भाजप जे यश अनुभवतोय, त्यात मोदींचे श्रेय आहेच, पण अनेक दशकांची कार्यकर्त्यांचीही मेहनत, संयम आणि संघर्ष आहे. मी आत्मविश्वासाने सांगतो, मी यश खेचून आणणार. महाराष्ट्रात तीनच पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. तुम्ही म्हणाल यादरम्यान राष्ट्रवादी हा पक्ष निर्माण झाला. पण तो पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या लोकांची मोळी होती. त्यामुळे एक जनसंघ, शिवसेना आणि मनसे हेच पक्ष तळागाळातून निर्माण झाले.

राष्ट्रवादीवाले आतून एकच
राष्ट्रवादीवर टीका करताना राज म्हणाले, एकदा राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले, तुम्ही कुठले? ते म्हणाले राष्ट्रवादी. पण कोणती राष्ट्रवादी? त्यानंतर दोघांनी शरद पवार, तर तिघांनी अजित पवार गट सांगितला. पण माझे अजूनही ठाम मत आहे की, आतून सगळे हे एकच आहेत, असे म्हणत राज यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

सत्ता द्या, भोंगे बंद करतो
ज्या भोग्यांचा मुस्लीम समाजालाही त्रास होतो, त्यासाठी मनसेच्या कार्यकत्यांना तुरुंगात टाकता? एकदा राज्य माझ्या हातात द्या, सर्व भोंगे एकसाथ बंद करून टाकतो, असा पुनरुच्चार राज यांनी केला. समुद्रकिनारी अनधिकृत दर्गा बांधत होते. पालिका, पोलिसांच्या का लक्षात आले नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.

हेही वाचा:

The post राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण appeared first on पुढारी.