लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

लाल वादळ pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वनहक्क दाव्यांच्या कामाला गती देताना तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ देणे, कांदा निर्यातबंदी शिथील करणे तसेच आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर लाल वादळाने सोमवारी (दि.४) आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी दीड तास यशस्वी शिष्टाई केली. दरम्यान, तीन महिन्यात मागण्या पुर्ण न झाल्यास पालकमंत्र्यांच्या मालेगावातील घरासमोर पुढील आंदोलन करु, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

माकपच्या नेतृत्वात आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम ठोकला. या दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. बैठकीत ३ महिन्यात जिल्हास्तरीय मागण्या सोडविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, १८ वर्षापासून केवळ आश्वासनांशिवाय हाती काहीच लाभत नसल्याने आंदोलनकर्ते आक्रमक होते. त्यामुळे लेखी आश्वासनासोबत अंमलबजावणीच्या मागणीवर ते ठाम राहिले. अखेर भुसे यांनी सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा केली.

वनहक्क दाव्यांच्या अंमलबजावणीसह अन्य मागण्यासंदर्भात तीन महिन्यांचा टाईम बॉन्ड कार्यक्रम हाती घेतला जाईल. अन्य जिल्ह्यात लाभार्थीअभावीचे घरकुलांचे उदिष्ट नाशिककडे वर्ग करण्यासह पोटखराबा असलेल्या परंतु सध्या कसत असलेल्या जमिनी वहितीमध्ये समावेश करणे, कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात पाठपुराव्यासह आशा सेविकांच्या मानधानात वाढ करण्याबाबत भुसे यांनी सकारात्मकता दर्शविली. तसे लेखी आश्वासनही शिष्टमंडळाच्या हाती सोपविले. त्यानंतर शिष्टमंडळाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, तीन महिन्यात मागण्या सोडविण्याचे आश्वासन मिळाले असले तरी लोकसभा निवडणूकीचा आचारसंहिता सांभाळून प्रशासनाला काम करावे लागणार आहे. याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. वनहक्काच्या अंमलबजावणीसह स्थानिक मागण्यांच्या कार्यवाहीबाबत तीन महिन्यांचा टाईम बॉन्ड कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवरील मागण्या सोडविण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल. -दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवत आज आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. पण मागण्यांबाबत तीन महिन्यात प्रतिपूर्ती न झाल्यास मालेगावला भुसे यांच्या घरासमोर आंदोलन करु. तसेच मागण्या पूर्ण झाल्यास हजारो बांधवांच्या उपस्थितीत भुसे यांची मालेगावमध्ये मिरवणूक काढण्यात येईल. -जे. पी. गावित, माजी आमदार.

परतीचा प्रवास सुखकर
आंदोलन स्थगितीच्या घोषणेनंतर आंदोलनकर्ते त्यांच्या साहित्यासह गावाकडे परतीच्या मार्गाला लागले. ज्यांच्याकडे वाहने नव्हती अशा बांधवांना पालकमंत्र्यांच्या सुचनेनूसार घरी पोहचविण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामूळे आठ दिवसांपासून घरापासून दुर असलेल्या आंदोलनकर्त्यांचा परतीचा प्रवास सुखकर झाला.

लाल वादळ pudhari.news
नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनावर यशस्वी तोडगा निघाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री दादा भुसे. (छाया: हेमंत घोरपडे)

The post लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले appeared first on पुढारी.