नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हमाली, तोलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे २० -२२ दिवसांपासून बाजार समितीमधील कांदा, धान्य लिलाव बंद होते. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती प्रशासनाने लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्याने बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २२) लिलाव सुरळीत झाले. मात्र, लेव्हीच्या मुद्द्यावर काहीच तोडगा न निघाल्याने लिलाव पुन्हा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे लासलगाव, सिन्नर व दिंडोरी वगळता चांदवड, पिंपळगाव बसवंत, मनमाड, देवळा, मनमाड, मालेगाव, येवला, नांदगाव या बाजार समित्यांत लिलाव प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी केंद्रांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
लेव्हीच्या मुद्यावरून व्यापारी व हमाल-मापारी कामागारांतील वादामुळे २० दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद होते. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तसेच बाजार समित्यांचेही उत्पन्न बुडाल्याने त्यांनाही कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासन, सहकार विभाग, व्यापारी व माथाडी कामगारांच्या संयुक्त बैठका घेण्यात आल्या. त्यातही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा काढून कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत सोमवार (दि. २२) पासून लिलावात सहभाग घेतला. मात्र, हमाल-माथाडी कामगारांनी त्यास विरोध दर्शवत हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे लासलगाव, सिन्नर व दिंडोरी बाजार समिती वगळता पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा या बाजार समित्यांतील लिलाव पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी पुन्हा खासगी खरेदी केंद्रांचा आधार घ्यावा लागला.
हमाल-मापारी कामगारांचे आंदोलन
जोपर्यंत हमाल-मापारी कामगारांना व्यापाऱ्यांच्या खळ्यावर जाऊ दिले जात नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हमाल-मापारी कामगार संघटनेने केला आहे.
हेही वाचा –