लेव्ही’ वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प

कांदा pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
हमाली, तोलाई आणि वाराई कपातीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत बहिष्कार कायम राहिल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषिमालाचे लिलाव सलग अकराव्या दिवशी ठप्प राहिले. विंचूर उपबाजार आवार वगळता जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील १६५ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

शेतकरी व व्यापारी वर्गासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त शूभ मानला जातो. शेतकरी आपला नवीन शेतमाल विक्रीला आणतो, तर व्यापारी या मुहूर्तावर खरेदी करतो. पण जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक येथील बैठकीत दिलेल्या आदेशाला पुन्हा एकदा केराची टोपली बघायला मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत व्यापारी लेव्ही भूमिकेवर ठाम राहिल्याने मंगळवारी कांदा व धान्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाही. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याचे सांगत शासन अथवा मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तुमच्या मागण्या कामगार आयुक्तांमार्फत शासनाला कळवू. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत कामगार आयुक्त व जिल्हा उपनिबंधक यांची एकत्रित तातडीची बैठक बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी लासलगावला बाजार समिती संचालकांची बैठक होणार आहे. बाजार समितीने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत व व्यापाऱ्यांना दिलेल्या सुख-सुविधा काढून घ्याव्यात, अशा तोंडी सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या असल्याचे समजते.

दरम्यान, शेतमालाचे लिलाव तातडीने सुरू करावे, अशी मागणी मुंबई आणि लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दररोज जिल्ह्यात 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून लिलाव पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होळकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना वेठीस न ठेवता व्यापारी व बाजार समित्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. शेतकरी इलेक्ट्रिक काटा करून स्वतः पैसे देतो. हायड्रोलिक ट्रॉलीने कांदा खाली करतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमाली व तोलाई कायमस्वरूपी बंद करावी. – विकास रायते, शेतकरी, खडक माळेगाव.

हेही वाचा:

The post लेव्ही' वरुन लिलाव झालाच नाही, १६५ कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.