लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

अग्नीशस्त्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीतील कायदा सुवस्था अबाधित राखण्यासाठी परवानाधारकांकडील अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यामध्ये ९४१ परवानाधारक असून त्यांच्याजवळ ९७९ शस्त्रे आहेत. त्यापैकी परवानाधारकांनी २२१ शस्त्रे ते वास्तव्यास असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्यामध्ये जमा करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करण्याबाबत आढावा घेण्यात आला. नाशिक शहर वगळता ग्रामीण भागामध्ये ९४१ शस्त्र परवानाधारकांची नोंद आहे. संबंधितांकडे ९७९ शस्त्रे असून, ती सर्व फायर आर्मच्या कक्षेत येतात. त्यानुसार आढावा घेताना २२१ शस्त्रे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, निवडणूक काळात दंगलीत सहभागी तसेच जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तींची शस्त्रे जमा केली जाणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार लाेकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिस ठाण्यात जमा असतील. अपवादात्मक परिस्थितीत शस्त्रे जमा करण्यापासून सूट मिळण्यासाठी संबंधित परवानाधारकाला पोलिस ठाण्यामार्फत पुनर्विलोकन समितीकडे अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, जो कुणी या नियमांचे उल्लंघन करील, तो इसम परवानाधारक दंडनीय कारवाईस पात्र ठरेल, असा इशारा पोलिस विभागाकडून देण्यात आला आहे.

शस्त्रे जमा करण्यासाठी नियम
– गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती
– जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती
– कोणत्याही वेळी पण खासकरून निवडणूक कालावधीत दंगलीत समावेश असलेल्या व्यक्ती.

जमा केली जाणारी शस्त्रे
कळवण ५, मालेगाव ३२, सुरगाणा २३, चांदवड ८, देवळा ६, दिंडोरी ११, इगतपुरी २३, निफाड ३७, नांदगाव १०, नाशिक २, पेठ ५, सटाणा २, सिन्नर १५, येवला २४, त्र्यंबकेश्वर १८, एकूण २२१.

हेही वाचा:

The post लोकसभा निवडणूक 2024 : जिल्हास्तरीय समितीचा निर्णय appeared first on पुढारी.