जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

वाहन खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक परिवहन विभागात जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ८९७ नविन वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे या ७८९ दिवसांच्या कालावधीत नाशिककरांनी सरासरी दररोज २७८ नविन वाहने खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहेे.

जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासून नाशिककरांनी १ लाख ४६ हजार १३८ दुचाकी, ३ हजार १०१ तीन चाकी, ३९ हजार ३९ चारचाकी वाहने व ३१ हजार ६१९ इतर प्रकारची वाहने खरेदी केली आहेत. त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे वाहन नोंदणीतून प्रादेशिक परिवहन विभागासही महसूल मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नागरिकांनी वाहनांची गरज ओळखून वाहन खरेदीवर भर दिला आहे. त्यानुसार २०२२ मध्ये नागरिकांनी सरासरी दररोज १७८ दुचाकी व ४८ चारचाकी वाहने खरेदी केली होती. त्याचप्रमाणे २०२३ मध्ये यात वाढ झाली. गत वर्षात नागरिकांनी सरासरी दर दिवसाला १८७ दुचाकी व ५० चारचाकी वाहने खरेदी केली. तर चालू वर्षात यात दोन महिन्यांतच सरासरी वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार चालू वर्षात ५९ दिवसांत नागरिकांनी सरासरी दररोज २२० दुचाकी व ५४ चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे वर्षागणिक जिल्ह्यातील वाहनांची संख्याही वाढत आहे.

वर्षनिहाय वाहनांची नोंद
वाहनांचा प्रकार              २०२२             २०२३             २०२४ (फेब्रुवारीपर्यंत)
दुचाकी                           ६४,९०२          ६८,२१०           १३,०२६
तीन चाकी                       ८९९               १,८२३             ३७९
चारचाकी                        १७,५९४           १८,२७३          ३,१७२
इतर                               १६,१३१            १२,९९८          २,४९०
एकूण                              ९९,५२६        १,०१,३०४       १९,०६७

हेही वाचा:

The post जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश appeared first on पुढारी.