वणवा! गवताळ भागात लागणाऱ्या वणव्यांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व संकटात

गंगापूर रोड : आनंद बोरा

नाशिक, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसर, चांदवड, येवला परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक, माळटिटवी आणि रातवा हे पक्षी आता दिसेनासेच झाले असून, जैवविविधतेवरील संकट वाढत आहे. गवताळ भागात लागणारे वणवे आणि परिसरातील माळरानावर होणाऱ्या प्लॉटिंगमुळे या दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. याठिकाणच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

नांदूरमध्यमेश्वर पक्षीअभयारण्यात रातवा हा दुर्मिळ होत चाललेला पक्षी बघावयास मिळतो. तपकिरी-करडा-बदामी रंगाचा त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असलेला भारतीय रातवा साधारण २४ सें. मी. आकाराचा निशाचर पक्षी आहे. हा उडताना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात. अंधार पडल्यावर सर्वत्र यांचे आवाज ऐकू येतात. झुडपी जंगले, शेतीचे प्रदेश, गावाच्या जवळील मोकळ्या प्रदेशात वास्तव्य असलेला हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. हे पक्षी जमिनीवर घरटे तयार करीत असतात. तर चांदवड, येवला परिसरातील माळरानावर दिसणारा धाविक आणि रानटिटवी हे पक्षी दिसतात.

धाविक हा पक्षी लहान कळपात दिसतात. ते आढळतात तेथे गवत त्यांच्यापेक्षा उंच नसते. कारण उंच गवत त्यांचे दृश्य अवरोधित करते. बिनशेती केलेल्या शेतात जमिनीतून उचललेले तृणधान्य, कीटक ते खातात. ते जमिनीवर जोरात धावतात. परंतु कर्कश आवाजाने ते उडतात. प्रामुख्याने मार्च ते ऑगस्ट या काळात प्रजनन करतात. तर माळटिटवी नेहमी आढळणाऱ्या टिटवीची ही भारतात सापडणारी दुसरी जात असून, साधी टिटवी ही पाणथळ जागी हमखास सापडते. तर ही माळटिटवी कोरड्या प्रदेशातील माळरानावर पण पाण्याच्याच आसपास आढळते. माळटिटवी आपल्याला एकेकटी किंवा जोडीने दिसते. पण क्वचित प्रसंगी आजूबाजूच्या ४ ते ६ टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसू शकतात. हे पक्षी स्थानिक असून, एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टिटव्यांबरोबरच दुसऱ्या मोठ्या पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवरच आढळतात आणि तुरुतुरु पळत जाऊन मातीतील किंवा पानांखाली दडलेले कीटक पकडून खातात. माळटिटवीचा विणीचा हंगाम उन्हाळ्यात असतो. या पक्ष्यांचे अंडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत आढळून आले. औद्योगीकरणामुळे झपाट्याने नैसर्गिक अधिवासात घट होत आहे. माळरानावरील झाडे, झुडपे, वेली टिकून राहिली तरच कीटक, पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल आणि आपली जैवविविधता टिकून राहील.

परिसंस्थेतील अन्नसाखळीत खंड

मानवाच्या स्वैर वर्तनाने पर्यावरणात अनियमितता निर्माण झाली आहे. याचा फटका जैवविविधतेला बसतो आहे. प्रदूषण व वृक्षतोड या कारणांमुळे वन्यप्राणी, पक्षी व कीटकांसह अनेक जैववैविध्य विनाशाच्या कडेला पोहोचत आहेत. अनेक प्राणी व पक्षी नामशेष होत चालले आहेत. या जैववैविध्यांचा र्‍हास असाच होत राहिला तर परिसंस्थेतील अन्नसाखळीत खंड पडेल. पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येणार आहे.

हेही वाचा :