वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट

कांदा प्रश्न,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर मार्चमध्ये ०.५३ टक्क्यांपर्यंत वाढला असून, गत तीन महिन्यांतील ही उच्चांकी पातळी ठरली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीमध्ये हाच दर ०.२० टक्क्यांवर होता. घाऊक किंमत निर्देशांक वाढण्यात कांद्याच्या वाढत्या दराची भूमिका मुख्य राहिली आहे. फेब्रुवारीत कांद्याचे घाऊक भाव २९.२२ टक्क्यांनी वाढल्यानंतर मार्चमध्ये ते तब्बल ५६.९९ टक्क्यांनी वाढल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कांदा दरातील उसळी सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असून, जूनपर्यंत तो गृहिणींनासुद्धा घाम फोडणार, हे स्पष्ट झाले.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालय दर महिन्याच्या पंधरा तारखेला घाऊक किंमत निर्देशांक जाहीर करते. केंद्र सरकारच्या आकेडवारीनुसार हा निर्देशांक गत तीन महिन्यांपासून वाढत चालला आहे. अर्थव्यवस्थेतील महागाई वाढत असल्याचे त्यातून प्रतित होत आहे. भाज्या, फळे, मांस, अंडी आणि दुधाच्या घाऊक दरातील वाढ ग्राहकांसाठी नकारात्मक बातमी ठरली आहे. घाऊक किंमत निर्देशांकात कांदा (०.१६ टक्के), टोमॅटो (१.८७ टक्के) आणि बटाटा (०.२८ टक्के) यांना नगण्य वेटेज असले तरी राजकारण ढवळून काढण्याची त्यांची ताकद जबरदस्त आहे.

कांदा निर्यातबंदी करूनही कांद्याचे घाऊक दर अद्यापही खाली येण्यास तयार नसल्याने सत्ताधारी भाजपला कांदा कोंडी सोडविण्यात अपयश आले आहे. आधी तीव्र दुष्काळ आणि नंतर नोव्हेंबरमध्ये गारपीटमुळे कांदा पिकाची पूर्णत: नासाडी झाली आहे. उन्हाळी कांदा मेमध्ये चाळीत सडला आणि लाल कांद्याला पावसाने शेतात सडविल्याने यंदा देशभर कांद्याचा पुरवठ्याचे गणित पूर्णत: विस्कळीत झाले आहे. एकट्या लासलगावला दररोज सरासरी ५० हजार ट्रॅक्टरमधून येणारा कांदा सध्या जेमतेम पाच-सहा ट्रॅक्टरवर येऊन ठेपला आहे. यंदा रब्बीच्या लागवडीत तब्बल तीस टक्के घट आल्याने कांद्याचे उत्पादन यंदा ४० टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे कांद्याचे दर काही करूनही खाली आले नाही. त्यातच लासलगाव बाजार समिती गत बारा दिवस बंद राहिल्याने देशभर कांद्याचा पुरवठा विस्कळीत होऊन रिटेल किमतीत सुमारे १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी (२०२३) मार्च महिन्यात कांद्याच्या घाऊक किमती ३६.८३ टक्क्यांनी घसरल्या होत्या. त्यावेळी बंपर माल बाजारात येत होता. परंतु यंदा दुष्काळाने परिस्थिती पार बदलून टाकली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांत कांद्याचे घाऊक दर सरासरी ४१.८५ टक्क्यांनी वाढले. निर्यातबंदीचे अस्त्र वापरूनही कांद्याने सरकारसमोर शरणागती पत्करलेली नाही, हे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

बटाटाही सरकारला रडविणार
कांद्याच्या दरात वाढीबरोबरच बटाट्याचे घाऊक दर फेब्रुवारीमध्ये १५.३४ टक्क्यांनी वाढल्यानंतर मार्चमध्ये ५२.९६ टक्क्यांनी वाढले आहेत. उत्तर भारतात यंदा अनेक ठिकाणी उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने बटाटा पिकाची नासाडी केली आहे. जानेवारीत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पावसाने दणका दिल्याने काढणीच्या वेळी आलेल्या बटाटा पिकाची नासाडी झाली. त्यामु‌ळे बटाट्याचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी (२०२३) मार्च महिन्यात बटाट्याच्या किमती जोरदार उत्पादनानामुळे २५.५९ टक्क्यांनी घसरल्या होत्या. परंतु उत्तरेत आलेल्या पुरामुळे त्याचनंतर थंडीत गारपिठीने यंदा बटाटाच्या उत्पन्नात तब्बल ४५ टक्के घट झालेली आहे. महागलेल्या बटाट्यामुळेसुद्धा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दराला बूस्ट मिळाला आहे. उत्तर भारतात अन्नधान्य महागाईचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत खूपच अग्रभागी आला असून, विरोधकांनी भाजपची याच मुद्यावरून जोरदार कोंडी केली आहे.

घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय
घाऊक किंमत निर्देशांक (डब्लूपीआय) घाऊक स्तरावरील वस्तूंच्या सरासरी किमतींमधील बदल प्रतिबिंबित करतो. मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या आणि ग्राहकांकडून खरेदी केलेल्या वस्तूंऐवजी व्यवसाय किंवा संस्थांदरम्यान व्यापार केलेल्या वस्तूंच्या दरांत दरमहा झालेले चढउतार हा निर्देशांक विचारात घेत असतो. डब्लूपीआयच्या इंडेक्स बास्केटमध्ये प्राथमिक वस्तू (भाजीपाला, डाळी, तेलबिया आणि अन्नधान्य आदी), इंधन आणि ऊर्जा आणि उत्पादित उत्पादने या तीन गटांतर्गत वस्तूंचे वर्गीकरण केले जाते.

कांद्याची घाऊक दरातील वाढ
ऑगस्ट २३ : ३४.१२ टक्के
सप्टेंबर २३ : ५६.०८ टक्के
ऑक्टोबर २३ : ६७.४३ टक्के
नोव्हेंबर २३ : १०९.४४ टक्के
डिसेंबर २३ : ९१.७७ टक्के
जानेवारी २४ : २९.१८ टक्के

हेही वाचा :

The post वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी जाहीर, चलनवाढ दरालाही बूस्ट appeared first on पुढारी.