विजय कोणाचा? राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. ४) मतमोजणी होत आहे. या दोन्ही मतदारसंघांचा निकाल काय असेल याविषयी सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांनी तर विजयासाठी ‘देव पाण्यात बुडविला’ आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ‘विजय आमचाच होणार’ असा दावा केला जात असून, विजयोत्सवाची जय्यत तयारीदेखील केली जात आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान पार पडले. नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, तर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यात सरळ लढत झाली. अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांनीही या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरासरी ६१ टक्के मतदान झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे व महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यात सरळ लढत झाली. दिंडोरीत सर्वाधिक ६३ टक्के मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीला यश मिळेल, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक व दिंडोरीचा विजय निश्चित करणारी असल्याचा दावा करत महायुतीच्या नेत्यांनी दोन्ही मतदारसंघांत विजयी मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे.

गद्दारांना धडा शिकविण्यासाठी नाशिककर जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली होती. नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा विजय होईल याची खात्री आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येतील. – सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या शब्दाला मान देत नाशिककर जनतेने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनाच मतपेटीतून विजयाचा कौल दिला आहे, मतमोजणीतून हे स्पष्ट होईल. गोडसे हे नाशिकमधून ‘हॅट्ट्रिक’ साधतील याचा विश्वास आहे. – अजय बोरस्ते, उपनेते, शिवसेना शिंदे गट

अब की बार ४०० पारचा नारा सत्यात येईल. महाराष्ट्रातही महायुतीला यश मिळेल. नाशिक व दिंडोरीत कमी फरकाने का होईना महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. दोन्ही मतदारसंघांत वाढीव मतदान झाल्याने त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होणार आहे. – प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप

यंदा मोदींची जादू देशात कुठेही चालली नाही. कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचा फटका निश्चितपणे भाजपला बसणार आहे. जनतेचा रोष मतदानातून प्रकट झाला. राज्यात दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. दिंडोरीतून मोठ्या फरकाने राष्ट्रवादीचे भास्कर भगरे विजयी होतील. – कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चितीत उशीर झाला असला तरी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी दाखविलेली एकजूट लक्षात घेता या मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवाराचा विजय होणार हे निश्चित आहे. गोडसेंचाच विजय होईल. – रंजन ठाकरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट

नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसने आघाडीचा धर्म निभावला. काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. – शिरीष कोतवाल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

हेही वाचा: