वृद्ध महिलांना मारुन करायचा लुटमार, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला

murder

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध महिलांना हेरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. विशाल प्रकाश गांगुर्डे (३५, रा. जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. जुगार खेळण्यासाठी त्याने सहा महिन्यांपूर्वी एका महिलेचा खून केला होता. १ जानेवारीला एका महिलेवर प्राणघातक हल्ला करीत दागिने चोरल्याचे उघड झाले आहे.

सामनगाव येथे १ जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सर्वेश्वर स्टाेअर दुकानात शिरून शकुंतला दादा जगताप यांच्यावर धारदार हत्याराने वार करीत शकुंतला यांच्या अंगावरील १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत होते. गुन्हे शाखा युनिट एकचेही पथक या गुन्ह्याचा तपास करीत होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. संशयिताची ओळख पटल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागूल, अंमलदार प्रवीण वाघमारे, नाजीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने संशयिताचा परराज्यात पाठलाग करीत पकडले.

सखोल तपासात त्याने जगताप यांच्यावर हल्ला करीत दागिने लुटल्याची कबुली दिली. तसेच गेल्या वर्षी जून महिन्यात लोखंडे मळा परिसरात सुरेखा ऊर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (६०) यांचा खून करून सोन्याचे दागिने लुटल्याचीही कबुली दिली. पोलिस आयुक्त संदीप दिवाण, उपआयुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी तपासी पथकास प्रशस्तिपत्रक दिले.

जुगाराच्या नादापायी गुन्हे

पोलिस तपासात विशाल गांगुर्डे यास जुगाराचा नाद असल्याचे समोर आले. जुगार खेळण्यासाठी त्याने त्याच्याच नातलगाच्या घरात चोरी केल्याचे उघड झाले. तसेच एकट्या वृद्ध महिलांना हेरून तो दागिने लुटत होता. उपनगर येथील बेलेकर यांच्या खुनाच्या गुन्ह्यात मोकाट असल्याने त्याने जानेवारी महिन्यात सामनगाव येथे वृद्धेवर हल्ला केला. सुदैवाने त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, विशाल हा सिरियल किलर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच त्यास पकडल्याने तो धोका टळला.

हेही वाचा :

The post वृद्ध महिलांना मारुन करायचा लुटमार, अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला appeared first on पुढारी.