नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी आहे. परंतु, गमे हे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणुकीतील मतदान व मतमोजणीचा महत्त्वाचा टप्पा पार पाडावा लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयाेगाने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले आहे. या कार्यक्रमानुसार १० जून रोजी मतदान, तर १३ तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. तत्पूर्वी बुधवारपासून (दि.१५) उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, २२ मे पर्यंत ते दाखल करता येतील. त्यानंतर २४ ला अर्ज छाननी, तसेच २७ मे रोजी माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल. ही सर्व प्रक्रिया विभागीय आयुक्त गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. परंतु, गमे हे ३१ मे रोजी निवृत्त होतील. त्यामुळे उर्वरित मतदान व मतमोजणीसाठी नव्याने अधिकारी येणार आहे.
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नगर असे पाच जिल्हे मिळून शिक्षक मतदारसंघांचे कार्यक्षेत्र आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी अंतिम यादीच्या प्रसिद्धीनुसार विभागात ६४ हजार ८०८ शिक्षक मतदार आहेत. पुरवणी यादीतून दोन हजारांच्या आसपास नव्याने शिक्षक मतदार वाढण्याची शक्यता आहे. पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र व जवळपास ६५ हजारांच्या आसपास मतदार असलेल्या या निवडणुकीची सर्व प्रमुख मदार ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे गमे यांच्या निवृत्तीनंतर आयुक्तपदी बसणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणुकीच्या दृष्टीने तत्काळ अपडेट राहावे लागणार आहे.
गेडाम, कुशवाह स्पर्धेत
रिक्त होणाऱ्या विभागीय आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार यावरून महसूल विभागात उत्सुकता आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपद भूषविलेले प्रवीण गेडाम तसेच २०१४-१५ सिंहस्थ कुंभमेळ्यात जिल्ह्याची यशस्वी धुरा सांभाळणारे तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे दाेघेही स्पर्धेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सरतेशेवटी आयुक्तपदाची सूत्रे कोण हाती येणार हे पाहावे लागेल.
हेही वाचा: