Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

आघाडी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नाशिकमधून ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, तर दिंडोरीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा उमेदवारी अर्ज रॅलीद्वारे दाखल केला जाणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाच्या शालिमार येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बडगुजर यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे आदी उपस्थित होते. सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या नाशिक व दिंडोरीतील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली जाईल. अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महाविकास आघाडीची सभा होणार असल्याचेही बडगुजर, शिंदे यांनी सांगितले. या रॅलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत माकप, भाकप, आपचे नेतेदेखील उपस्थित राहणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.

महायुतीला नाशिकमध्ये अद्याप उमेदवार मिळत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीने नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा बडगुजर यांनी केली आहे. उमेदवारीरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून, ज्या पक्षाच्या वाट्याला उमेदवारी येणार नाहीत तेच महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाचे कारण ठरतील, असा अदावाही बडगुजर यांनी केला आहे.

करंजकर यांचा दावा फेटाळला
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्याला अद्यापही बोलवणे आले नसल्याचा दावा ठाकरे गटाचे नाराज माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केला आहे. करंजकर यांचा हा दावा विद्यमान जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी फेटाळून आला. ठाकरेंचे स्वीय सहायक रवि म्हात्रे यांनी दोन वेळा करंजकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत ‘मातोश्री’वर पाचारण केले होते. परंतु करंजकर यांनी प्रतिसाद दिला नाही, असे बडगुजर यांनी सांगितले.

हेही वाचा: