नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये विजयी उमेदवार भास्कर भगरेंची लाखभर मते बाबू भगरे यांनी केवळ नामसाध्यर्म्यामुळे मिळवली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नामसाधर्म्यचा भगरे पॅटर्न बघायला मिळत आहे. उमेदवार किशोर दराडे, संदीप गुळवे यांना इतर उमेदवारांबरोबरच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांशीही लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) अखेरची मुदत होती. त्यामुळे त्या ठिकाणी सकाळी १० पासूनच उमेदवारांची समर्थकांसह गर्दी झाली होती. त्यातही अनेकांनी अपक्ष उमेदवारी करत अर्ज दाखल केले. विद्यमान आमदार किशोर दराडे यांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गटाचे भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुतीचे नेते हजर होते. तसेच प्रमुख प्रतिस्पर्धी ॲड. संदीप गुळवे यांनीदेखील उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
विद्यमान आमदार किशोर भिकाजी दराडे यांच्या नावाला साधर्म्य म्हणून किशोर प्रभाकर दराडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करत असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांचे नामसाधर्म्य असलेल्या संदीप भीमाशंकर गुळवे, संदीप नामदेव गुळवे हेदेखील निवडणूक लढवत आहेत. याशिवाय संदीप वामनराव गुरुळे हेदेखील मैदानात असून, शिक्षक मतदार मतदानावेळी गोंधळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: