नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह जिल्ह्यासाठी भगीरथाप्रमाणे गंगापूर धरणाचे महत्त्व आहे. मात्र, या गंगापूर धरणासह समूहातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट दिसून येत आहे. त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरला पिकनिक स्पॉटचे स्वरूप आले आहे. मद्यपींचा धरण परिसरात वावर वाढला असून, यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे धरण म्हणून गंगापूरसह इतर धरणांचे महत्त्व आहे. धरण समूहाच्या सुरक्षेबाबत जलसंपदा विभागाकडून मात्र दुर्लक्षच होताना दिसत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेशास बंदी असतानाही वाहने धरणाच्या बॅकवॉटरपर्यंत पोहोचत आहे. प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याने धरणाच्याच बॅकवॉटरला पर्यटकांची गर्दी उसळत आहे. यात काही मद्यपी धरणाच्या परिसरात धांगडधिंगाना घालताना दिसतात. त्यामुळे महिलावर्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धरण परिसरात अनेकांनी पक्की बांधकामे केली आहेत. त्यात काही व्यावसायिकांनी मोठ-मोठे हॉटेल व बिअर बार थाटले आहेत. धरणाच्या परिसरात पक्की बांधकामे करण्यासाठी परवानगी नसताना बांधकामे झालीच कशी? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. धरण परिसरात बिअर बारला परवानगी देण्याचे कारणच काय, असाही सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. जलसंपदा व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवत यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत हॉटेल्सचा सुळसुळाट appeared first on पुढारी.