सायबर गुन्हे: कायदे, तंत्रज्ञानाविषयीचे अज्ञान ठरतेय अडचणीचे

नाशिक : गौरव अहिरे

‘तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहे’, ‘पोर्नोग्राफीत तुमचा सहभाग आढळून आला आहे’, असे बालंट आणत स्काइप हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हिडिओ कॉलवरून पोलिस अधिकारी बोलत असल्याचे भासवून नागरिकांना आॅनलाइन अटक केल्याचे भासवले जाते. त्यानंतर नागरिकांची बँक खाती सील करण्याची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेत आॅनलाइन पद्धतीने पैसे परस्पर वळते करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकारही शहरात घडत आहेत. अज्ञानामुळे नागरिक भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.

शहरात दाखल गुन्ह्यांनुसार ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष, मॉर्फ फोटो-व्हिडिओ व्हायरल करणे, सैन्य दलातील अधिकारी बदली झाल्याने स्वस्तात घरगुती साहित्य विक्री करण्याचे आमिष दाखवून भामटे गंडा घालत असल्याचे दिसून आले आहे. भामट्यांच्या आमिषाला, धमक्यांना नागरिक बळी पडल्यानंतर ते लाखो रुपयांची फसवणूक करतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अनेकदा कारवाईची भीती दाखवून नागरिकांना स्काइप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर नागरिकांच्या आधारकार्ड, डेबिट कार्डसहित बँकिंग डिटेल्स घेतले जातात. तसेच राष्ट्रीय गोपनीयता कायद्यानुसार संबंधित नागरिकास हा प्रकार इतर कोणालाही सांगता येणार नाही, असाही धाक भामटे दाखवतात. त्यानंतर काही क्षणात पैसे काढून फसवणूक केली जाते. हे बिंग फुटेपर्यंत बराच उशीर झालेला असतो. तेव्हा पैसे परत मिळवण्यास अडचणी येतात. तर अनेकदा नागरिक सायबर पोलिसांकडे उशीरा तक्रार करतात किंवा करतही नाही. त्यामुळेही भामट्यांचे फावले जाते.

बँक खाती भाडेतत्त्वाने

फसवणुकीची रक्कम बँक खात्यात मागवण्यासाठी भामट्यांनी गोरगरीब लोकांचे बँक खाती भाडेतत्त्वाने घेतल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. नाशिक सायबर पोलिसांनीही याप्रकरणी एका बँक खातेधारकास अटक केली होती. फसवणुकीची रक्कम आल्यानंतर १० टक्के किंवा ठराविक रक्कम बँक खातेधारकास देत भामटे काही क्षणात पैसे काढून घेतात. त्याचप्रमाणे काही पैसे बिटकॉइनमार्फत परदेशात पाठवले जातात. त्यानंतर पुन्हा ते भारतात मागवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

क्षणात बँक खाते रिकामे

तुमच्यावर कारवाई झाली असून, तुमची बँक खाती सील करायची आहे, असे सांगून भामटे नागरिकांना घाबरवतात व त्यांच्याकडून बँक खाती, क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती घेतात. त्यानंतर आॅनलाइन पद्धतीने बँक खात्याचा ताबा घेत खात्यातील पैसे परस्पर दुसऱ्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जातात. यात अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची मुदतठेवी, गुंतवणूक मोडून भामटे पैसे घेत असल्याने नागरिकांची आयुष्याची जमापुंजी काही क्षणात भामट्यांच्या हाती पडत आहे.

घाबरू नका

ड्रग्ज सापडले, मनी लॉंडरिंग, माॅर्फ फोटो या प्रकरणांमध्ये नागरिकांनी घाबरू नये. कुरिअर मागवले नसेल तर तुमच्या नावाने कुरिअर कसे आले हा प्रश्न असतो. त्यामुळे न घाबरता समोरील व्यक्तीस टाळा. त्याने कारवाईची भीती दाखवल्यास घाबरू नये. कारण पोलिस कारवाई करताना पूर्वकल्पना देत नाही तर थेट अटक करण्यासाठी तुमच्या ठिकाणांपर्यंत येतात. तसेच बँक खाती सील करण्यासाठी पोलिस बँकेशी पत्रव्यवहार करतात. त्यानंतर खाती सील होतात. त्यामुळे ऑननलाइन अटक किंवा बँक खाती सील होईल अशा भूलथापांना बळी पडू नका. अशा प्रकारचे फोन आल्यास सायबर पोलिस किंवा जवळील पोलिसांना कळवा.
रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

शिक्षेची तरतूद

फसवणूक केल्याप्रकरणी भामट्यांविरोधात फसवणूक करणे, अपहार करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) व इतर कलमांनुसार गुन्हे दाखल केले जातात. त्यानुसार गुन्हा शाबित झाल्यास संबंधितांना सात वर्षे कारावास व दंड अशी शिक्षेची तरतूद असते. मात्र, या गुन्ह्यांमधील आरोपी अटक होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: