नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे वाहकांनी पुकारलेल्या संपानंतर गेली नऊ दिवस ठप्प झालेली सिटीलिंकची शहर बससेवा शनिवारी (दि.२३) दहाव्या दिवशी सुरळीत सुरू झाली. दरम्यान, या संपामुळे झालेले पासधारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतल्याची माहिती व्यवस्थापक (संचलन) मिलिंद बंड यांनी दिली.
सिटीलिंककडून वेतनापोटी आगाऊ रक्कम स्वीकारूनही वाहक पुरवठादाराने वाहकांचे वेतन थकविल्याने तसेच पीएफ व ईएसआयसीची रक्कमही न भरल्यामुळे वाहकांनी दि. १४ मार्चपासून संप पुकारला होता. तब्बल नऊ दिवस चालेल्या या संपामुळे चाकरमाने, प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. संपकाळात रिक्षा तसेच खासगी प्रवासी वाहनांनी दुपटीने भाडे आकारल्यामुळे सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. सिटीलिंकने ग्रॉस टू कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर ही बससेवा सुरू केली असल्यामुळे संपात बसेस डेपोतच उभ्या राहिल्या असल्या, तरी बस ऑपरेटर्सना मात्र प्रतिबस ४ हजार रुपये प्रतिदिन या दरानुसार सिटीलिंकला पैसे मोजावेच लागले. त्यामुळे सिटीलिंकचेही या संपामुळे मोठे नुकसान झाले.
ठेकेदाराची जबाबदारी असूनही सिटीलिंकने वाहकांच्या वेतनापोटी ६५ लाख रुपये, तर पीएफपोटी एक कोटी रुपये जमा केले. त्यानंतर शुक्रवारी या संपावर कसाबसा तोडगा निघू शकला. संपकाळात बससेवा बंद राहिल्याने पासधारकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी भाजप, मनसे तसेच ग्राहक पंचायतीकडून करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत पासधारकांना पुढील नऊ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, संपाला जबाबदार धरत ठेकेदारावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पूर्ववत २,५४० बसफेऱ्या
नाशिक रोड डेपोतून शुक्रवारी सायंकाळपासूनच बससेवा पूर्ववत सुरू झाली. या डेपोतून ९८ बसेस पूर्ववत धावायला सुरुवात झाली, तर तपोवन डेपोतील बससेवा शनिवारी सकाळपासून सुरू झाली. तपोवन डेपोतून १४८ बसेस सुरू झाल्या. या २४६ बसेसच्या माध्यमातून शनिवारी २,५४० बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या.
हेही वाचा:
- Citylink Nashik | सिटीलिंकचा फैसला आता आयोगाच्या न्यायालयात
- Citylink Nashik | वाहक आंदोलनावर ठाम; संपामुळे ऐन परीक्षाकालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
- Citylink Nashik | सिटीलिंकच्या संपामुळे बससेवेला ७० लाखांचा तोटा
The post सिटीलिंक पासधारकांना नऊ दिवसांची मुदतवाढ appeared first on पुढारी.