नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले. त्यामुळे आठ दिवसांनंतर मंगळवार (दि. ५)पासून सीबीएस ते अशोकस्तंभ मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा मार्ग पूर्ववत झाल्याने नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तत्पूर्वी महापालिका प्रशासनाने रात्रीतून या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली.
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच आदिवासींना घरकुल उपलब्ध करून द्यावे यासह विविध मागण्यांसाठी माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर ठिय्या मांडला. शेतकऱ्यांनी रस्त्यातच तंबू ठोकले. तसेच दिवस-रात्र याच ठिकाणी स्वंयपाक करीत होते. परिणामी सीबीएस चौक ते अशोक स्तंभ असा दुहेरी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला. शहराचा मुख्य मार्गच बंद पडल्याने त्याचा फटका अवघ्या शहरवासीयांना सहन करावा लागला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि.४) माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेवेळी मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने सदर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रात्रीतून आंदोलनकर्ते हे त्यांच्या-त्यांच्या गावाकडे परतले. दरम्यान, पालकमंत्री भुसे यांनी या मार्गावर तातडीने स्वच्छता मोहीम राबवित सदरचा रस्ता नाशिककरांसाठी खुला करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने रात्रीतून मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. तसेच मंगळवार (दि.५)पासून हा रस्ता नाशिककरांसाठी खुला करून देण्यात आला.
व्यवसायावर परिणाम
सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासह न्यायालय, वकिलांचे दालन, शाळा, बँका तसेच अन्य कार्यालये, दुकाने व आस्थापना आहेत. शेतकरी आंदोलनामुळे आठ दिवसांपासून या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प पडले होते. परिणामी परिसरातील व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने व्यावसायिकांना आर्थिक झळ सहन करावी लागली.
The post सीबीएस-अशोकस्तंभ मार्ग आठ दिवसांनी खुला; महापालिकेकडून रात्रीत स्वच्छता appeared first on पुढारी.