सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात आज निर्णयाची शक्यता

सुधाकर बडगुजर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. या नोटिसीबाबत बाजू मांडण्यासाठी बडगुजर हे आज शनिवारी (दि. १८) पोलिसांसमोर हजर राहणार आहे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना शहर पोलिसांकडून बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावली होती. बडगुजर यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी परिमंडळ दोनच्या उपआयुक्त मोनिका राऊत यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले होते. त्यानुसार बडगुजर यांनी दहा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र पोलिसांनी आठ दिवसांची मुदत दिली. त्यामुळे बडगुजर हे आज शनिवारी (दि. १८) राऊत यांच्या कार्यालयात हजर राहून बाजू मांडतील.

बडगुजर यांच्याविरुद्ध डिसेंबर २०२३ पासून दोन गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतच्या पार्टीतील व्हिडिओ प्रकरणासह महापालिकेतील कंत्राटासंदर्भात गुन्हा नोंद आहे. यासह बडगुजर यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये निवडणुकीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने बडगुजर यांना शिक्षा सुनावली होती. मात्र, शिक्षेविरुद्ध बडगुजरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बडगुजर त्यांची बाजू मांडल्यानंतर पोलिस काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे

हेही वाचा: