पहिलेच भीषण दुष्काळी परिस्थिती, त्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान, तप्त उन्हाची दाहकता… यामुळे भूजलपातळी ८० ते ९० फूट खोलपर्यंत गेली आहे. पर्यायाने चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन किमी अंतरापर्यंत पायपीट करण्याची वेळ आली आहे. सध्या चांदवड तालुक्यातील नागरिकांची तहान निफाड तालुक्यातील शिवरे, जळगाव, कातरगाव, सुंदरपूर गावातून टँकरद्वारे भागवली जात असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
चांदवड तालुक्यात एकही मोठे धरण नसल्याने तालुक्याच्या हक्काचे पाऊसपाणी न आडता निफाड, देवळा तालुक्यात वाहून जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे चांदवड तालुकावासीयांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गतवर्षी तर अल निनोच्या प्रभावामुळे तालुक्यात जेमतेम पर्जन्यमान राहिले. पावसाळ्यापासूनच दुष्काळी स्थिती आहे. विहिरी, बोअरवेल, नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यामुळे भर पावसाळ्यापासून ते आजतागायत तालुक्यातील गावांमध्ये शासनामार्फत टँकरद्वारे पाणी पोहोचवले जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून वातावरणातील तापमान वाढल्याने भूजलपातळी ८० ते ९० फूट खोलपर्यंत गेली आहे. पर्यायाने थोड्याफार विहिरी, बोअरवेलला असलेले पाणीदेखील आटले आहे.
जूनचेही आव्हान
सध्या तालुक्यातील २८ गावे आणि ७२ वाड्यांना दररोज ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. हा अल्प पाणीपुरवठा असल्याने पाणी जपून वापरण्याचा कटू प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे. मे व जून दोन महिने जायचे असल्याने पिण्याच्या पाण्याच्या तीव्रतेत मोठी भर पडणार आहे. तेव्हा पाणीपुरवठा करायचा कसा या चिंतेत प्रशासकीय यंत्रणा सापडली आहे.
शासनावर मदार
मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची मोठी दाहकता वाढली आहे. नागरिकांची तहान भागवण्यासाठी शासकीय यंत्रणातत्पर दिसत आहे. निफाडतालुक्यातील शिवरे, जळगाव, कातरगाव, सुंदरपूर गावातून चांदवड तालुक्यातील गावांना दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे चांदवड तालुक्यातील बहुतेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चांदवड तालुक्यातील २८ गावे अन् ७२ वाड्यांना दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. निफाड तालुक्यातील तीन गावांमधून सध्या तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. – मंदार कुलकर्णी, तहसीलदार, चांदवड.
हेही वाचा: