‘स्ट्राँग रूम’, ‘ईव्हीएम’ वाटप; संकलित केंद्रांसह मतदान केंद्रांभोवती पहारा

महाराष्ट्रात प्रचाराला पूर्णविराम!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत शनिवारी (दि. १८) सायंकाळी प्रचार थंडावला. त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘स्ट्राँग रूम’, ‘ईव्हीएम’ वाटप व संकलित केंद्रांसह मतदान केंद्रांभोवतीच्या परिसराचा पोलिसांनी ताबा घेतला आहे. शहरात सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी ‘स्ट्राँग रूम’, मतदान केंद्रांसह शहरातील विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. हा बंदोबस्त सोमवारी (दि. २०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमध्ये पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी बंदोबस्तासह फिरते गस्ती पथक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त करीत आहेत. शहर व ग्रामीण पोलिसांसह महाराष्ट्र पोलिस अकादमी, लातूर, गडचिरोली, गोंदिया येथील पोलिस अंमलदार आणि नागपूर प्रशिक्षण केंद्रांतील प्रशिक्षणार्थी पोलिस अंमलदार व होमगार्ड यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यांच्यासोबत राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), आंध्र प्रदेश सशस्त्र राखीव पोलिस (एसएपीएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शनिवारी (दि. १८) दुपारी पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मतदान केंद्रांसह ‘स्ट्राँग रूम’चा आढावा घेत सूचना दिल्या. रविवारी (दि. १९) सकाळपासून ‘ईव्हीएम’ व निवडणूक साहित्य सशस्त्र बंदोबस्तात मतदान केंद्रांवर तैनात होईल. रात्रभर पोलिसांचा कठोर पहारा असेल. त्यानंतर सोमवार (दि. २०) सकाळपासून मतदान संपेपर्यंत व ‘ईव्हीएम’सह निवडणूक साहित्य पुन्हा ‘स्ट्राँग रूम’पर्यंत पोहोचेपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

अकरा प्रमुख अधिकारी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, मुख्य निवडणूक निरीक्षक पी. एस. प्रद्युम्न, पोलिस निवडणूक निरीक्षक अकुन सबरवाल, खर्च निवडणूक निरीक्षक प्रवीण चंद्रा व सागर श्रीवास्तव यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी नाशिक पूर्वचे भीमराज दराडे, नाशिक मध्यसाठी जतिन रहेमान, नाशिक पश्चिमच्या भारदे, देवळालीकरिता शर्मिला भोसले यांची पथके कार्यरत असतील.

पोलिसांचा विभागनिहाय बंदोबस्त
विभाग – बंदोबस्त प्रभारी अधिकारी
पंचवटी – पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी व सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव
सरकारवाडा – पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ
अंबड – पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख
नाशिक रोड – पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी
बंदोबस्त समन्वय – विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके
आपत्कालीन पथक – गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे
नियंत्रण कक्ष – प्रशासनचे सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे

विधानसभा मतदारसंघनिहाय ‘स्ट्राँग रूम’ची सुरक्षा
– नाशिक पूर्व : क्रीडा संकुल, नवीन आडगाव नाका
– नाशिक मध्य : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर
– नाशिक पश्चिम : छत्रपती संभाजी स्टेडिअम, सिडको
– देवळाली कॅम्प : गोदावरी हॉल, त्र्यंबकरोड
– ‘स्ट्राँग रूम’ : अंबड वेअर हाउस

नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, देवळाली कॅम्प या विधानसभा मतदारसंघांतील स्ट्राँग रूममध्ये ‘ईव्हीएम’ संकलन होणार आहे. त्यासाठी येथे सशस्त्र पथके तैनात आहेत, तर अंबड येथील ‘स्ट्राँग रूम’मध्ये दिंडोरी व नाशिकचे ‘ईव्हीएम’ असतील. यासाठी एक पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, दोन निरीक्षक, पाच सहायक व उपनिरीक्षकांसह 60 अंमलदारांचा फौजफाटा तैनात आहे. याठिकाणी सीआरपीएफ व एसआरपीएफची प्रत्येकी १-१ तुकडी तैनात असेल.

– पोलिस आयुक्तालयात निवडणूक कक्ष
– ‘ईव्हीएम’ क्यूआरटी व स्ट्रायकिंग फोर्सच्या बंदोबस्तात रवाना
– दंगल नियंत्रण पथकात ४६, तर जलद प्रतिसाद पथकात ४७ अंमलदार
– निवडणूक अधिकारी, निरीक्षकांना ‘एस्कॉर्ट’
– सोशल मीडियावर गस्तीसाठी स्वतंत्र पथक
– शहराबाहेरील बंदोबस्त समन्वयासाठी स्वतंत्र पथक

विभागनिहाय बंदोबस्त
पोलिस मुख्यालय – ९४ अंमलदार
अंबड विभाग – ९३ अंमलदार
सरकारवाडा विभाग – ९३ अंमलदार
नाशिक रोड विभाग – ९७ अंमलदार
पंचवटी विभाग – ९७ अंमलदार

शहर पोलिसांचा फौजफाटा
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त बंदोबस्ताचे नियोजन करत आहेत. शहरात २२५ पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक असे अधिकारी आहेत. तसेच २४०० पोलिस अंमलदारांचा फौजफाटा तैनात आहे. बूथ बंदोबस्तासाठी एक हजार ७० अंमलदार, ७१३ होमगार्ड असतील. मतदान केंद्रावरील १०० मीटर बंदोबस्तासाठी ५५ अधिकारी, ४३८ अंमलदार, २७७ होमगार्ड तैनात राहतील. पोलिस क्षेत्रीय गस्ती पथकात १०७ अधिकारी, १०७ अंमलदार आहेत. तर पोलिस ठाणे गस्तीसाठी ३७ अधिकारी, १६४ अंमलदार, तर महसूल क्षेत्रीय बंदोबस्तासाठी ११४ अंमलदार तैनात आहेत. तसेच आंध्र प्रदेश पोलिसांच्या ५ तुकड्या, सीआरपीएफ २ तुकड्या बंदोबस्तात तैनात आहेत.

सोमवारी (दि. २०) नाशिककरांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे यासाठी शहरातील बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. नाशिककरांनी जास्तीत जास्त मतदान करावे. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

हेही वाचा: