हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार

हेमंत गोडसे, सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून येऊनदेखील शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यामुळे गोडसे यांची अस्वस्थता वाढली असून, ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच सिन्नरमधील मेळाव्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी गोडसे संपर्कात असल्याचा दावा केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोडसे यांनी बडगुजर यांचा दावा फेटाळून लावला असून, बडगुजर हेच स्वत: यापूर्वी शिंदे गटाच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीत संघर्ष सुरू आहे. सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनदेखील गोडसे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही. तब्बल दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊनदेखील गोडसे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. भुजबळ यांच्या उमेदवारीला थेट दिल्लीतून बळ दिले गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाशिकची जागा हातून निसटण्याच्या भीतीने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. सर्वेक्षणाचे कारण देत भाजपकडून राज्यातील पाच ते सहा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाची कोंडी केली जात आहे. नाशिकची जागाही भाजपेयींच्या विरोधामुळेच संघर्षाची बनल्याने शिंदे गटात नाराजी आहे. अशा परिस्थितीतही गोडसे यांचा उमेदवारीसाठी लढा सुरूच आहे. गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपच्या केंद्रीय नेत्यांसमवेत चर्चा सुरू आहे. त्यामुळेच नाशिकच्या उमेदवारीचा निर्णय अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सिन्नरमधील ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात खळबळजनक दावा केला आहे. ‘हेमंत गोडसेंचे तीन माणसे माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या म्हटले, पण मी त्यांना सांगितले गद्दारांना माफी नाही, आता वेळ निघून गेली तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा, असे वक्तव्य बडगुजर यांनी केले आहे. दरम्यान, बडगुजर यांचा दावा गोडसे यांनी फेटाळून लावला आहे.

शिंदे गटाकडून उमेदवारी मिळत नसल्यामुळे गोडसे नाराज आहेत. त्यांनी तीन माणसे आपल्याकडे पाठविली होती. पदरात घ्या, असा संदेश पोहोचविला. परंतु गद्दारांना माफी नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची क्लिपही आपल्याकडे उपलब्ध आहे. – सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीचा निर्णय होईल. बडगुजर यांच्याकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी नव्हे तर बडगुजर हेच शिंदे गटात येण्यासाठी यापूर्वी संपर्कात होते.

– हेमंत गोडसे, खासदार, शिंदे गट


हेही वाचा :

The post हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार appeared first on पुढारी.