होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग

होळी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळीचा उत्सव रविवारी (दि.२४) साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून, होळीच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. होळीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रीकरिता बाजारात दाखल झाल्या आहेत.

हिंदु धर्मात सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. शेवटच्या मराठी महिन्यातील फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश आहे. यंदा रविवारी सुटीच्या दिवशीच होळीचा सण आल्याने नाशिककरांमध्ये उत्साह संचारला आहे. अवघे शहर या उत्सवासाठी सज्ज होत आहे. होळीत दहन करण्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या घेऊन शेकडो शेतकरी शहरात दाखल झाले आहेत. गोदाघाटासह पेठ रोड, इंदिरानगर, सिडको, सातपूर व नाशिकरोड आदी भागांत या शेतकऱ्यांनी गोवऱ्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या गोवऱ्या घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. यंदा गोवऱ्यांचे दर वाढल्याने होळी उत्सव साजरा करताना खिशाला काहीसा भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, गोवऱ्यांसोबतच होळीसाठी लागणारे पूजा साहित्य, हार-कडे तसेच अन्य वस्तू घेण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही होळी तयारीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रोजगाराच्या निमित्ताने शहराकडे आलेले आदिवासी बांधव हा सण साजरा करण्यासाठी गावी परतले आहेत.

होळीची कहाणी
होळीचा सण साजरा करण्यामागे एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाच्या राजाचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता. पण, हिरण्यकश्यपूला ते अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे राजाने याेजना आखत आपली बहीण होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले, प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. त्यावेळी एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवले की, तिला वरदानात असेही सांगितले होते किकी, ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काही ही करू शकला नाही. पण, होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला.

वीरांच्या पाडव्यासाठी तयारी
होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. २५) धुलिवंदनाला नाशिकमध्ये वीरांचा पाडवा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मानाच्या दाजीबा वीरासह घराघरांतून वीरांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यंदाही परंपरा कायम राखली जाणार असून, मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post होलिकात्सवासाठी शहरात सर्वत्र उत्साह; गोवऱ्या खरेदीची लगबग appeared first on पुढारी.