७८ पोलिसांना पदोन्नती; खात्यांतर्गत परीक्षेतूनही बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीची लगबग संपल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासकीय कामांतर्गत शहर पोलिस दलातील ७८ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये तीन सहायक उपनिरीक्षकांना श्रेणी उपनिरीक्षकपदी बढती मिळाली, तर ३५ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक आणि ४० पोलिस नाईक यांना हवालदारपदी बढती देण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार पोलिस सेवेत ३० वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेले आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी तीन वर्षे कर्तव्य पार पाडलेल्या तिघांना श्रेणी उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. यात पोलिस मुख्यालयातील अविनाश झोपे, शहर वाहतूक शाखेतील साहेबराव गवळी आणि अशोक तांबे यांचा समावेश आहे.

ठाणे अंमलदार पदी पदोन्नती झालेले सुभाष गायकवाड

३५ हवालदारांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यामध्ये मोटर परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखा, मुख्यालय, नागरी हक्क संरक्षण, विशेष शाखा यांसह पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर ४० पोलिस नाईक पदावरील कर्मचाऱ्यांची हवालदारपदावर बढती झाली. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांच्या पसंतीचे संवर्ग मागवून त्याची यादीही महासंचालक कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली होती. मात्र, अजूनही त्यांच्या नियुक्तीचे आदेश न निघाल्याने त्यांच्यात नाराजी पसरलेली आहे.

प्रभारींकडेही लक्ष

शहर पोलिस दलातील काही कर्मचारी व अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात नव्याने पाेलिस अधिकारी दाखल झाले आहेत. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनाही पोलिस ठाणे बदलून हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी अर्ज दिल्याचे समजते. निवडणूक संपल्याने आता या अर्जांवर निर्णय होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांची बदली होणार असल्याची चर्चा आहे. तसेच पोलिस ठाण्यांचे प्रभारी निरीक्षकही बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: