अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

अंनिस pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) अभिनव उपक्रम राबविला. सातपूरच्या कामगारनगर येथील रिक्षा स्टँडवर रिक्षाला लावलेले लिंबू-मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. यापुढे आम्ही रिक्षाला अशा प्रकारचे लिंबू-मिरची बांधणार नाही. लिंबू-मिरची हे खाण्याचे पदार्थ असून, त्यांचा उपयोग खाण्यासाठी करू, असा निर्धार यावेळी करण्यात आला. (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti)

महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे म्हणाले की, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात. त्याबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी हे अभियान अंनिसकडून राबविण्यात येत आहे. या अभियानात रिक्षा चालक मालक दादासाहेब राठोड, सुभाष पवार, अनिल पाटील, सीताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोल्हे आदी सहभागी झाले होते. यावेळी मनपा शाळा क्रमांक १७ च्या शिक्षिका शालिनी पगार व आशा बागूल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti)

The post अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम appeared first on पुढारी.