‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

धार्मिक स्थळ www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी सोग्रस (ता. चांदवड) येथील धार्मिकस्थळ अतिक्रमणाच्या घटनेने वातावरण दूषित होत असतानाच गुरुवारी (दि. २९) प्रशासनातर्फे तत्काळ बैठक घेत या प्रकारात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. हे धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्व गावकरी व प्रशासनामार्फत घेण्यात आल्याने ग्रामस्थांच्या एकोप्याचे सर्वत्र काैतुक होत आहे.

सोग्रस येथील धार्मिक स्थळाबाबत सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत असताना, गावचे सरपंच भास्कर गांगुर्डे, उपसरपंच शंकर गांगुर्डे, पोलिसपाटील यांच्यासह ग्रामस्थांनी हे धार्मिक स्थान हे सर्व समाजाचे श्रद्धास्थान असून, गावातील लोकांच्या विविध आनंदोत्सवात तेथे सर्वधर्मीय पूजाविधी करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे आदींसह दोन्ही समाजांतील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामाजिक एकोप्याने या प्रकारावर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले. याबाबत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने धार्मिकस्थळास जागा देण्यात येणार असून विधिवत स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली.

नितेश राणे यांच्या व्यक्तव्याने सोग्रस चर्चेत

चांदवड ये‌थील साेग्रसजवळ राष्ट्रीय महामार्गावर हिरवी चादर टाकून मजार बांधली जात असल्याचा आरोप करत मजार काढा नाहीतर, त्याच्या बाजूला हनुमान मंदिर उभारू, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केल्याने साेग्रस चर्चेत आले होते. मात्र, हे धार्मिक स्थळ हे सर्व धर्मीयांचे असून याबाबत ग्रामस्थांनी एकोप्याने प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा :

The post 'ते' धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग appeared first on पुढारी.