अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल

लासलगाव (जि. नाशिक) वार्ताहर 
जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा भारतीय केशर आंबा अमेरिकेत समुद्रामार्गे अवघ्या 25 दिवसांत पोहोचला आहे. अमेरिकेत होणारी आंबा निर्यात ही सध्या शंभरटक्के हवाईमार्गाने होत असताना देखील समुद्रामार्गाने पाठविण्यात आलेला भारतीय केशर आंबा अगदी सुस्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे.

मुंबई येथून कृषि पणन मंडळाच्या सुविधेवरून दि. ५ जुन २०२२ ला समुद्रामार्गे पाठविलेला आंबा 2 जुलै ला अमेरिकन बाजारपेठेत पोहोचला. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा आणि सानप ऍग्रोनिमल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांनी अमेरीकेत समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्यात आला. आंब्याचा कंटेनर दि. ३० जुन २०२२ रोजी अमेरीकेतील नेवार्क बंदरात दाखल झाला. कंटेनर दि. १ जुलै २०२२ रोजी आयातदार मे. अनुसया फ्रेश प्रा. लि. यांनी ताब्यात घेऊन उघडल्या नंतर कंटेनर मधील आंबा सुस्थितीत पोहचल्याचे निदर्शनास आले.

भारतातून सन २०२२ मध्ये अमेरीकेस सुमारे ११०० मे. टन आंब्याची निर्यात झाली आहे. अमेरीकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या १०० टक्के हवाईमार्गे होत आहे. यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे रु. ५५० / – विमानभाडे अदा करावे लागत असून यामुळे अमेरीकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किंमतीच्या दृष्टिने महाग पडत असून निर्यातीवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनरद्वारे पाठविण्याचा निर्णय घेऊन नाशिक येथील मे. सानप ऍग्रोनिमल्स चे संचालक हेमंत सानप या निर्यातदाराच्या मदतीने आंबा निर्यात केला. आंबा हंगाम २०२२ मध्ये कंटेनरद्वारे आंबा थेट अमेरीकेत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. याकरिता अमेरीकेत आंबा निर्यात करणा- या निर्यातदारांच्या बैठका घेण्यात आल्या. कंटेनरसाठी दि. २९ मे २०२२ ते ०२ जुन २०२२ असे पाच दिवस आंबा नोंदणीकृत बागांमधून तोडणी करुन कृषि पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आणण्यात आला. भाजीपाला प्रक्रिया केंद्र येथे आंब्याची प्रतवारी करुन त्यावर सोडीयम हायपोक्रोराईटची ५२ डि.से. तापमानात तीन मिनिटांची प्रक्रिया करून आंबा सुकविण्यात आला. त्यानंतर आंब्यावर भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरने विकसीत केलेल्या रसायनाची पाण्यामध्ये तीन मिनिटांची प्रक्रिया करुन पुन्हा आंबा सुकविण्यात आला. हा आंबा तीन किलोच्या बॉक्स मध्ये भरुन त्याची विकिरण सुविधा केंद्रात वाहतूक करुन त्याचे अमेरीकन इस्पेक्टर आणि एन.पी.पी.ओ. च्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मान्यतेनंतर आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आंबा प्रशितकरण करुन त्याची साठवणूक शितगृहात करण्यात आली होती.

एकूण ५५२० बॉक्सेसमधून १६,५६० किलो आंबा कंटेनरव्दारे दि. ०३ जुन २०२२ रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदराकडे रवाना करण्यात आला. तेथून दि. ०५ जुन २०२२ रोजी हा कंटेनर अमेरीकेकडे रवाना झाला. कंटेनर अमेरीकेत नेवार्क या न्यु जर्सी शहराजवळील बंदरात दि. २९ जून २०२२ रोजी म्हणजे २५ दिवसांनी पोहोचला. आंबा समुद्रमार्गे निर्यात सुरु झाल्यास अमेरीकेत आंब्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. तसेच आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. भारतातून हवाईमार्गे आंबा निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो पाचशे पन्नास रुपये खर्च येतो त्या तुलनेत समुद्रामार्गे निर्यात केल्यास शंभर रुपये प्रति किलोचा खर्च येतो. हवाईमार्गे आणि समुद्रामार्गे वाहतूक खर्चाचा विचार केल्यास प्रतिकिलो साडेचारशे रुपयांची किलो प्रमाणे बचत होत असल्याचे निर्यातदार हेमंत सानप यांनी बोलताना सांगितले. यामुळे अमेरीकेच्या बाजार पेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने स्पर्धात्मक ठरुन इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा करु शकतो. तसेच आपणास अमेरीकेची बाजार पेठ जास्त कालावधीसाठी उपलब्ध होवू शकते.

यामुळे हवाई वाहतुकीमध्ये आंब्याचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होवून आंबा अधिक चांगल्या पध्दतीने आणि उत्तम स्थितीत परदेशी बाजार पेठेत उपलब्ध होईल. तसेच अमेरीके बरोबरच इतर देशांनाही समुद्रमार्गे निर्यात शक्य होणार आहे. अमेरीकेस समुद्रमार्गे निर्यातीसाठी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरचे डॉ. गौतम, कृषि पंणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार तसेच अमेरीकेच्या इंस्पेक्टर डॉ. कॅथरीन फिडलर यांनी मार्गदर्शन केले. बी.ए. आर. सी चे अधिकारी एन. पी. पी. ओ. चे अधिकारी सानप ऍग्रोनिमल्स हेमंत सानप तसेच कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, अभिमन्यू माने, सुशिल चव्हाण यांनी विशेष परीश्रम घेतले.

हेही वाचा :

The post अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल appeared first on पुढारी.