अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट

द्राक्ष निर्यातीला ब्रेक,www.pudhari.news

राकेश बोरा, नाशिक

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस, गारपीट आणि सध्याच्या ढगाळ वातावरणाचा फटका बसला असून, निर्यातक्षम द्राक्ष म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात  (Grape Export) थांबली आहे. दरवर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असतात. मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने निर्यातीला ब्रेक लागला आहे. स्टोअरेजमध्ये असलेल्या द्राक्षांना कॅगिंग जाण्याची भीती तसेच तयार होण्याच्या मार्गावरील द्राक्ष मालाला अवकाळीचा फटका बसल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे.

मागील हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून सहा हजार ७९६ कंटेनरमधून जवळपास ९० हजार ४९३ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात  (Grape Export) झाली होती. संपूर्ण देशातून एक लाख ६९ हजार ६५० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्यामधून १५८६ कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले होते.

द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी तसेच युरोपियन देशांत होणाऱ्या निर्यातीकरिता रासायनिक अंशमुक्त द्राक्षाच्या निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्यात येते. २०२३-२४ च्या हंगामाकरिता निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या हंगामासाठी दि. ५ डिसेंबरपर्यंत राज्यातून सात हजार ४६६ प्लॉटची नोंदणी झाली असून, त्यापैकी ७ हजार ४५८ प्लॉटची नोंदणी महाराष्ट्रातून, तर आठ प्लॉटची नोंदणी कर्नाटकमधून झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षबाग नोंदणी निम्म्याहून अधिक घटली आहे.

भारतात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक असून, नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. निर्यात सुरू होण्यास अजून १५ ते २० दिवस लागतील, अशी माहिती द्राक्ष निर्यातदारांनी दिली. मात्र, दुसरीकडे सध्या पडत असलेल्या दाट धुक्यामुळे द्राक्षमण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच काय, तर द्राक्ष बागायतदारांसमोर संकटाचे वादळ घोंघावत राहणार असल्याचे दिसते.

द्राक्ष निर्यात आलेख (Grape Export)

२०१७-१८ -१८८२२१ मेट्रिक टन- १९०० कोटी

२०१८-१९ -२४६१३३ मेट्रिक टन- २३३५ कोटी

२०१९-२० -१९३६९० मेट्रिक टन- २१७७ कोटी

२०२०-२१ – २४६१०७ मेट्रिक टन- २२९८ कोटी

२०२१-२२ – २६३०७५ मेट्रिक टन- २३०२ कोटी

२०२२-२३ – १६९६५० मेट्रिक टन- १५८६ कोटी

या देशांत निर्यात

नेदरलॅण्ड, ब्रिटन, जर्मनी, लॅटविया, डेन्मार्क, स्वीडन, पोर्तुगाल, स्वित्झलॅण्ड, पोलंड, बेल्जियम, फिनलॅण्ड, इटली, स्पेन.

हेही वाचा :

The post अवकाळीने द्राक्ष निर्यातीला ब्रेक, निर्यातक्षम द्राक्षबाग नोंदणीतही घट appeared first on पुढारी.