आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकणाऱ्या तरुणास मुंबईतून अटक

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडिया ‘एक्स’ वर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह मत व्यक्त केल्याबद्दल सायबर पोलिस ठाण्यात ‘अपार भारत’ या खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित खातेधारक अमेय प्रधान यास अटक केली आहे. त्यास न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

सिन्नर फाटा येथील रहिवासी हेमंत तायडे यांच्या फिर्यादीनुसार, ७ फेब्रुवारीला ‘एक्स’ वरील अपार भारत या खात्यावर आक्षेपार्ह मजकूर होता. या मजकुरामुळे सामाजिक भावना दुखाविण्यासह दोन गटांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे तायडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत सायबर कलमांसह ‘ॲट्रोसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अमेय यास शुक्रवारी (दि.९) रात्री मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पोस्ट अपलोड केल्यासंदर्भात पोलिसांत खुलासा केला. दरम्यान, नाशिक न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी (दि.१२) त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयिताच्या अटकेनंतर राजकीय दबावदेखील वाढल्याची चर्चा होती. शहर पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, सोशल मीडियावर ‘एक्स’वर यासंदर्भात अमेयच्या विरोधात व समर्थनार्थ अनेक राजकीय पोस्ट अपलोड झाल्याचे दिसले. सोशल मीडियावर दोन गटांत तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह पोस्ट अपलोड न करण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. संशयित अमेय हा ३० वर्षीय असून तो उच्चशिक्षीत आहे.

हेही वाचा

The post आक्षेपार्ह 'पोस्ट' टाकणाऱ्या तरुणास मुंबईतून अटक appeared first on पुढारी.