कुपोषित बालकांच्या पालकांना पुरवणार २५ मादी, तीन नर कोंबड्या

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने कुपोषित बालकांसाठी (Malnourished children) कोंबडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारी (दि.९) सुरगाणा तालुक्यातील ३४ कुपोषित बालकांच्या पालकांना प्रत्येकी २५ कोंबड्या आणि तीन नर कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे. या कोबड्यांच्या अंड्यांमुळे बालकांचे पोषण होण्यास मदत होणार असून, त्यांच्या पालकांना देखील अंड्यांच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अतिगंभीर कुपोषित आणि मध्यम गंभीर कुपोषित बालकांची (Malnourished children) संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी पशुसंवर्धन विभाग कोंबड्या देणार आहे. कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते. त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते. तसेच अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात, जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंड्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

सेस निधीतून पाच लाखांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पाच लाख रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. कोंबड्यांसोबतच त्या कोंबडीच्या वाढीसाठी लागणारे खाद्यदेखील जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पुरविणार आहे. साधारण २० आठवड्यांचे खाद्य यामधून पुरवले जाणार आहे.

सुरगाणा या आकांक्षित तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून कुपोषणमुक्तीसाठी कुपोषित बालकांच्या पाल्यांना कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे. यातून बालकांचे पोषण होण्यासोबतच पालकांना उत्पन्नदेखील सुरू होईल. – आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

The post कुपोषित बालकांच्या पालकांना पुरवणार २५ मादी, तीन नर कोंबड्या appeared first on पुढारी.