नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक

नाशिक : अतिक्रमण पथकावर दगडफेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरातील अनधिकृत झोपड्या हटविताना झोपडीधारकांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक केली होती. मंगळवारी (दि. ३०) पेठरोडवरील अनधिकृत झोपड्या हटविताना तेथील रहिवाशांनी पथकावर बेछुट दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पथकातील जेसीबीसह वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या मोहिमेदरम्यान, तब्बल वीस झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरात धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत शहरातील सहाही विभागांत ही मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. ३०) पेठरोड भागात ही मोहीम राबविली असता, अतिक्रमणधारकांनी या पथकावर बेछुट दगडफेक केली. त्यामुळे पथकातील जेसीबीसह वाहनांची तोडफोड झाली. संतप्त नागरिकांनी दगडांचा मारा सुरू केल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षितस्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष बाब म्हणजे पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना हा सर्व प्रकार घडल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

The post नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक appeared first on पुढारी.