आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड

अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. शनिवारी (दि. १६) आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. त्यात शस्त्र बाळगणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी दि. १६ ते २२ मार्च या कालावधीत १८ गुन्हे दाखल करून, २४ जणांना पकडून त्यांच्याविरोधात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. त्याचप्रमाणे अवैध धंदेचालक, जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे, अवैध मद्यविक्रेते व साठा करणारे, शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस ठाणेनिहाय तसेच गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून कारवाई होत आहे. त्यानुसार दि. १६ ते २२ मार्च दरम्यान, पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करत २४ जणांना पकडले. त्यांच्याकडून २३ शस्त्रे जप्त केली आहेत. त्यात दोन देशी कट्टे व सहा जिवंत काडतुसे तसेच २१ कोयते, चाॅपर, तलवार, सुरा अशी धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी सर्वाधिक पाच गुन्हे अंबड पोलिस ठाण्यात दाखल असून, त्याखालोखाल इंदिरानगर व आडगावच्या हद्दीत प्रत्येकी तीन-तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच नाशिकरोड, पंचवटी हद्दीत प्रत्येकी दोन-दोन व गंगापूर, सातपूर आणि उपनगरच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक गुन्हा दाखल आहे. जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत १ लाख २२ हजार ९५० रुपये आहे. संशयितांकडून जप्त केलेले देशी कट्टे त्यांनी कुठून व कशासाठी आणले, याचा तपास पोलिस करीत आहेत.

अल्पवयीनांकडेही शस्त्रे
पोलिसांनी पकडलेल्या २४ संशयितांपैकी सहा संशयित हे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे आढळली आहेत. १५ ते १७ वयोगटातील हे संशयित असून, पोलिसांनी त्यांचा पूर्वेतिहास तपासून त्यांची चौकशी सुरू केली आहे, तर इतर संशयित १९ ते ३९ वयोगटातील असून, त्यापैकी काही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले. तसेच अंबड हद्दीतील एका तडीपार गुंडाकडेही कोयता आढळला आहे.

दोघांवर प्राणघातक हल्ले
आचारसंहिता लागू झाल्यापासून दाखल गुन्ह्यांमध्ये दोन प्रकरणांत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रांचा वापर करून दोघांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. याप्रकरणी भद्रकाली व उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर गंगापूर व मुंबई नाका पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत शस्त्रांचा वार करून दोघांना दुखापत केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा:

The post आचारसंहितेत शस्त्र बाळगणारे २४ जण गजाआड appeared first on पुढारी.