उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा

मराठा आंदोलन,www.pudhari.news

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील सकल मराठा समाजाने मंगळवारी (दि.३१) आक्रमक भूमिका घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री रामदास कदम आणि ॲड. सदावर्ते यांच्या छायाचित्रांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून तिरडीचे एकात्मता चौकात दहन करण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी मज्जाव केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये ओढाताण झाली. मात्र अखेर मराठा बांधव आणि भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करत तिरडीचे दहन केलेच. सरकारने मराठा समजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, तातडीने आरक्षण द्यावे अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. (Maratha Andolan)

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू असून, त्यास सहा दिवस उलटूनही आरक्षणाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यातच जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक होऊन राज्यभरात आंदोलने होऊ लागली आहेत. मनमाडला तीन दिवसांपासून पालिकेजवळ उपोषण केले जात असून, मंगळवारी छत्रपती शिवाजीनगर भागातून केंद्रीय मंत्री राणे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री भुजबळ, माजी मंत्री कदम आणि ॲड. सदावर्ते यांच्या छायाचित्रांची अंत्ययात्रा काढण्यात आली. (Maratha Andolan)

‘आरक्षण आमचं हक्काचं.. नाही कोणाच्या बापाचं..’, ‘कोण म्हणतं देणार नाही.. घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ.. जय शिवराय’ आदी घोषणा देत शहरातील विविध मार्गांवरून तिरडी एकात्मता चौकात आणण्यात आली. तिच्या दहनावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये ओढाताण झाली. परंतु, मराठा बांधव आणि भगिनींनी अखेर तिरडीचे दहन केलेच. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात हजारो समाजबांधव, भगिनी, विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात हाेता. (Maratha Andolan)

हेही वाचा :

The post उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या प्रतिमांची मनमाडला तिरडी यात्रा appeared first on पुढारी.