बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम

द्राक्ष pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये इतका आयातशुल्क वाढवला आहे. तो व्यवहार्य नसल्याने देशातील व्यापारी द्राक्ष निर्यात करण्यास धजावत नाहीत. परिणामी, द्राक्ष निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पर्यायाने ७० ते ८० रुपये प्रतिकिलो विकणारे द्राक्ष आज २० ते ३० रुपये दराने विक्री होत आहेत. ढासळलेले दर हे बागायतदारांचे कंबरडे मोडणारे आहेत. कांद्यापाठोपाठ द्राक्षांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरीवर्गात सरकारबाबत प्रचंड असंतोष पसरला आहे.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. हे द्राक्ष चवीने गोड असल्याने जगभरात त्यांना मोठी मागणी असते. दरवर्षी लाखो टन द्राक्ष हे बांगलादेश, नेपाळ, भूतानसह इतर देशांत निर्यात केले जातात. दरवर्षी साधारणपणे द्राक्ष ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होतात. त्यातून एकरी खर्च जाऊन दोन पैसे उरत असल्याने द्राक्ष उत्पादक खूश होता. मात्र, यंदा केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष हंगामालाही बसला आहे.

देशातून बांगलादेश, नेपाळसह इतर देशांना कांदापुरवठा बंद झाला. त्यामुळे बांगलादेशात कांद्याचा बाजारभाव किलोला १२० ते १३० रुपये इतके वाढला आहे. तेथे कांद्याचे उत्पादन कमी असल्याने भारताने निर्यात खुली करावी, अशी मागणी बांगलादेश सरकारने केली होती. मात्र, भारताने अद्यापही कांद्यावरील निर्यातबंदी कायम ठेवलेली आहे. परिणामी, बांगलादेश सरकारने भारतातून येणाऱ्या द्राक्षांवर प्रतिकिलो १०४ रुपये आयातशुल्क लावत एकप्रकारे काेंडी केली जात आहे. हे आयातशुल्क जास्त असल्याने बांगलादेशासाठी व्यापारी द्राक्ष घेण्यास धजावत नाहीत. आजघडीला नाशिक जिल्ह्यातील बहुतेक सर्वच द्राक्षबागा विक्रीयोग्य झाल्या आहेत. परंतु, खरेदीदार येत नसल्याने कवडीमोल दराने माल विक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वर्षभर द्राक्षबागा सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी येणारा खर्च अन‌् होणारे उत्पादन यात चालू वर्षी मोठी तफावत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारच्या आयात – निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जगातील देश भारताबरोबर व्यापार करण्यास पुढे येत नाहीत. केंद्राने कांदा निर्यातबंदी केल्याने बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या द्राक्ष मालावर प्रतिकिलो १०४ रुपये आयातशुल्क लादले. परिणामी द्राक्ष निर्यात ठप्प झाली. त्यामुळे द्राक्षांचे भाव २० ते ३० रुपये प्रतिकिलो झाले. हा मोठा आर्थिक फटका आहे. – बापू शिरसाठ, द्राक्ष उत्पादक शेतकरी, बहादुरी.

हेही वाचा:

The post बांगलादेशाने लादलेल्या १०४ रुपये आयातशुल्काने निर्यातीवर परिणाम appeared first on पुढारी.