एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ एका युवकाचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आले होती. रस्त्याने कामावर जाणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यातील एकाने पोलिसांना कळविले होते. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेतील खून झालेल्या तरुणाचे नाव चेतन ठमके असे आहे. त्याला या भागात कोणी आणले होते का, तो स्वतःच आला होता याबाबत पोलिस शोध घेत होते. त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले असल्याने, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या युनिट एकच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अंमलदार आप्पा पानवळ व मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारांमार्फत दोघे संशयित आरोपी हे एका पांढऱ्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीवर सातपूर परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधिकारी तोडकर, साबरे, ठाकरे, परदेशी, शेख, पानवळ, चारुस्कर, जगताप यांनी सातपूर, श्रमिक नगर येथे सापळा रचून, पंकज विनोद आहेर (वय-२५, शिवकृपा स्वीट समोर, महाकाली चौक, त्रिमुर्ती नगर, सिडको, अंबड) व आशिष रामचंद्र भारद्वाज (वय-२३, रा. शुभम पार्क, अंबड) यांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अॅक्टिव्हा गाडी व गुन्ह्यातील हत्यार लोखंडी कायदा असा ५० हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा :

The post एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या appeared first on पुढारी.