एकाच रात्रीत तीन ठिकाणी दरोडा, दहा जण जखमी

दरोडा

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा ; येथील कमोदकर, कटके-कापसे वस्तीसह लगत राहणाऱ्या शुक्ला यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री 11 च्या सुमारास आठ जणांनी दरोडा टाकत मारहाण करून महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

दरोडेखोरांनी दारू पिऊन दत्तू दिलीप कमोदकर यांच्या वस्तीवर हल्ला केला. नंतर बबन देवराम कमोदकर यांच्या वस्तीवरही चाकू, कुऱ्हाड, लोखंडी पाइपने हाणामारी करून चाकूने पायावर वार करत महिलांच्या अंगावरील दागिने खेचले. रात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान कटके-कापसे वस्तीलगत राजकुमार शुक्ला यांच्या वस्तीवर हल्ला केला. यावेळी राजकुमार शुक्ला बाहेरच होते. दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत घरात झोपलेल्या मुलाला दम देत दार उघडण्यास भाग पाडले. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत महिला व मुलगा विकास याला शस्त्राचा धाक दाखवून घरातील रोकड 22 हजार व 20-22 तोळे सोने, चांदी दागिने असा माल घेऊन मुलांच्या पायावर वार केले. शुक्ला यांच्या घरी लग्न समारंभ असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी धाव घेत घटनेची माहिती मनमाडचे पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी दिली. घटनास्थळी नाशिक डॉगस्कॉडला पाचारण केले असता, डाॅग राणा याने मूळबाई घाटाखालीपर्यंत मार्ग दर्शविला. यावेळी पोलिस हवालदार संतोष काळे व पोलिस कांतीलाल डुमरे होते. या घटनेमुळे नगरसूलसह परिसर व तालुका धास्तावला आहे. पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे.

जखमींची नावे

दरोड्यात अनिल बबन कमोदकर (४८), सविता अनिल कमोदकर (३५), तेजस अनिल कमोदकर (२१), शुभम अनिल कमोदकर (२२), दत्तू दिलीप कमोदकर (४५), बबन देवराम कमोदकर (७५), नर्मदा बबन कमोदकर (७०), युवराज प्रवीण गोसावी (१३), तर राजकुमार रामजी शुक्ला (५२), विकास राजकुमार शुक्ला (३८) आदी जखमी झाले असून, त्यांना रात्री नगरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याने त्याला नगरसूलच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांच्यावर सिस्टर व इतरांनी औषधोपचार केले.

हेही वाचा :

The post एकाच रात्रीत तीन ठिकाणी दरोडा, दहा जण जखमी appeared first on पुढारी.