एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात

ड्रग्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेफेड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर यातील फरार तिसऱ्या संशयिताच्याही मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. अनंत जायभावे असे संशयिताचे नाव असून, त्याला नाशिकरोड येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यातील एकजण टिप्पर गँगचा सदस्य असल्याने, इतरही काहींचा यात सहभाग आहे काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.

निखिल बाळू पगारे (२९, रा. पाथर्डी फाटा), कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (२२, रा. उत्तमनगर, सिडको) या दोन संशयितांनी गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात कारमधून प्रवास करताना संशयितांनी हातात एमडी पावडरची पुडी घेतलेली होती. याच काळात एमडी रॅकेट उघडकीस येऊन शिंदे गावातील दोन कारखाने उद्ध्वस्त हाेऊन वडाळागावात एमडी विक्रेत्या महिलेसह दोघांना अटक, तर सामनगाव एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड झाली होती. त्यानंतरही संशयितांनी व्हिडिओ व्हायरल करत अप्रत्यक्षरीत्या पोलिसांनाच आव्हान दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने निखिल व कुणाल या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा २० ग्रॅम एमडीचा साठाही जप्त केला होता.

दरम्यान, यातील एक जण फरार असल्याने, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यास कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले होते. पोलिस अंमलदार राहुल पालखेडे यांना अनंत जायभावे हा नाशिकरोड येथील बीएमएस मार्केट या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश साळुंके, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी यांनी सापळा रचत त्यास ताब्यात घेतले. त्यास अंमली पदार्थविरोधी पथकाचे तपासी अधिकारी हेमंत फड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्ह्याची दिली कबुली

सापळा रचून पोलिसांनी संशयित अनंतला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने अनंत सर्जेराव जायभावे (३०, रा. फ्लॅट नं. ७, स्वामी समर्थनगर, जत्रा हॉटेलमागे, आडगाव) असे नाव व पत्ता सांगितला. त्याला गुन्ह्याबाबत विचारले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

The post एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात appeared first on पुढारी.