एसटीपीच्या जागेचा प्रश्न; नाशिक मनपाची एमआयडीसीकडे धाव

STP pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर राबविण्यात येणारा २७८० कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्प (Namami Goda Project) आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा भाग असलेल्या कामटवाडे व मखमलाबाद येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्र अर्थात एसटीपीकरिता (Standard Temperature and Pressure) अद्याप जागा उपलब्ध न झाल्याने या प्रकल्पाचा सुधारित आराखडा अंतिम होऊ शकलेला नाही. कामटवाडे प्रकल्पाच्या जागेसाठी महापालिकेने ‘एमआयडीसी’कडे धाव घेतली असून, मखमलाबादचा प्रकल्प तपोवनात हलविण्याची तयारी केली जात आहे. (Namami Goda Project)

२०२७-२८मध्ये नाशकात सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालीन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. सल्लागार संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत केंद्राला सादर केला होता. या योजनेत नवीन मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीबरोबरच अस्तित्वातील जुन्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण प्रस्तावित आहे. (Namami Goda Project)

जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेअंतर्गत नाशिक शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्तावदेखील महापालिकेने शासनाला सादर केला होता. या प्रस्तावांबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेचे संचालक अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या दोन्ही प्रस्तावांतील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आयआयटी रुरकीनेदेखील काही सुधारणा सुचविल्यानंतर महापालिकेने या प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण करत सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला. परंतु, या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या कामटवाडे आणि मखमलाबाद येथील प्रस्तावित मलनिस्सारण प्रकल्पांसाठी अद्याप जागा निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे नमामि गोदाचा प्रकल्प अहवाल शासनाला सादर करण्यास विलंब होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कामटवाडे व मखमलाबाद मलनिस्सारण केंद्रांच्या जागेचा प्रश्न न सुटल्यास नमामि गोदा आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे. (Namami Goda Project)

महापालिकेची नामुष्की
‘एमआयडीसी’तील कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याची योजना आहे. मात्र, या प्रकल्पातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांडपाणी भूमिगत गटारींमध्ये सोडण्यास महापालिकेकडून विरोध केला जात होता. आता मात्र कामटवाडे येथील प्रस्तावित मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेने एमआयडीसीला पत्र पाठवत अंबड एमआयडीसी क्षेत्रात चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही जागा उपलब्ध करून दिल्यास प्रक्रियायुक्त रासायनिक सांडपाणी भूमिगत गटारींमध्ये सोडण्यास परवानगी दिली जाईल, अशी विनवणी महापालिकेने एमआयडीसीला पत्राद्वारे केली आहे. (Namami Goda Project)

नमामि गोदा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामटवाडे व मखमलाबाद एसटीपीकरिता जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामटवाडे प्रकल्पासाठी अंबड एमआयडीसीत चार एकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे. तर मखमलाबाद येथील प्रकल्प तपोवनात हलविण्याचा विचार केला जात आहे. – संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण, मनपा.

The post एसटीपीच्या जागेचा प्रश्न; नाशिक मनपाची एमआयडीसीकडे धाव appeared first on पुढारी.