कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात

Onion Price www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगाव बाजार समितीत कांदा दर पुन्हा घसरले असून, कांद्याला कमाल 1,675 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांची पुन्हा निराशा झाली आहे. सात महिन्यांनंतर कांद्याला नीचांकी दर मिळाल्याने कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे देशांतर्गत कांद्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होत असताना, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात काही तरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात काहीच घोषणा न झाल्याने व्यापारी आणि शेतकरी यांची घोर निराशा झाली.

बुधवारी (दि. 17) कांद्याला १९ जूनच्या तुलनेत सात महिन्यांनंतर लासलगाव बाजार समितीत नीचांकी १,६७५ रुपये इतके दर मिळाला. सरासरी 1,500 रुपये, कमीत कमी 600 रुपये इतके प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे.

लाल कांदा सरासरी १,५०० रुपये दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. कांदा निम्म्याहून अधिक दराने कोसळल्यामुळे शेतकरी वर्गाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. ३४00 रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. पण निर्यातबंदी जाहीर झाली व भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील कांदाही बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा :

The post कांदा नीचांकी पातळीवर, शेतकरी पुरता संकटात appeared first on पुढारी.