कॉग्रेसच्या अश्विनी बोरस्ते यांचा भाजपात प्रवेश

अश्विनी बोरस्ते भाजप प्रवेश www.pudhari.news

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या सहकार चळवळीत काम करणाऱ्या सिडको प्रभाग क्रमांक २४ मधील कॉग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते यांनी मुंबई येथे भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काल, सोमवार मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर तसेच महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत महिलांचे सक्षमीकरणातून बचत गटाचे योगदान फार मोठे आहे. त्या माध्यमातून विकासाच्या कामांना अधिक गती मिळावी, केंद्र व राज्य यांच्या माध्यमातून या सुविधा गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी अश्विनी बोरस्ते यांचा फार मोठा उपयोग पक्षाला होणार आहे.

अश्विनी बोरस्ते यांना महिला बालकल्याण, सिडको नवीन नाशिक, सभापती तसेच स्थायी समिती या कामांचा अनुभव आहे. तसेच सामाजिक चळवळीतील महिला सक्षमीकरण बचत गटाच्या कार्यासाठी तसेच शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातही त्या कार्यरत आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना आजवर ८० च्यावर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रतिभा मस्के, भारती निकम, आकाश गाडे आदी उपस्थित होते. या नियुक्ती बद्दल आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले तसेच शहराचे अध्यक्ष प्रशांत जाधव, महिला अध्यक्षा सोनाली ठाकरे, मंजुषा दराडे, नायडू , ज्योती अहिरराव, ललिता पाटील आदींनी अभिनंदन केले.

हेही वाचा :

The post कॉग्रेसच्या अश्विनी बोरस्ते यांचा भाजपात प्रवेश appeared first on पुढारी.