गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नदीप्रदुषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नदी प्रदूषणास कारणीभूत नागरीक, व्यावसायिक, उद्योजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही डॉ. करंजकर यांनी दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विभागीय महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या निर्देशांनुसार महापालिकास्तरावर आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक पार पडली. नदी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या. गोदावरी नदी पात्रात सांडपाणी मिश्रित होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. गोदावरी नदीत सांडपाणी सोडणारे व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार व कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिल्या.

या बैठकीप्रसंगी माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख उपायुक्त डॉ विजयकुमार मुंडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नितीन नेर, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.आवेश पलोड, कार्यकारी अभियंता गणेश मैंड, गोदावरी कक्षाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, जितेंद्र पाटोळे, उपअभियंता नितीन राजपूत, रवी पाटील, जितेंद्र कोल्हे, प्रशांत बोरसे, अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, विभागीय स्वच्छता निरीक्षक गोसावी, बागुल आदी उपस्थित होते.

उपसमितीचा नदीघाट पाहणी दौरा

दरम्यान, या पार्श्वभूमीवर नंदिनी नदीवरील अंबड लिंक रोडवरील पूल, शुभम थिटएटर परिसरातील पूल, गोरक्षनाथ पूल, सद्गुरु नगर जवळील नाला, गंगापूर रोड येथील नाला, परीचा बाग येथील नाला, चोपडा लॉन्स जवळील नाला आदींसह इतर नाल्यांचे पाणी मिळून गोदावरी प्रदूषित होऊ नये यासाठी उपसमितीतील अधिकाऱ्यांनी व सदस्यांनी संयुक्त पाहणी केली.

हेही वाचा :

The post गोदावरीचे प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश appeared first on पुढारी.