घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : घराची साफसाफाई करतांना विजेच्या तारेवर पाय पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुनिल संजय चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे.  बुधवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे ही घटना घडली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
याबाबत अधिक असे की, सुनिल चव्हाण हा जळगावातील बोहरा गल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी आईवडील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनिल चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते. सुनिल संजय चव्हाण (वय-१६) आणि सागर शिंदे हे दोघे गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करत असतांना सुनिलचा पाय खाली पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी रूग्णाालयात आक्रोश केला होता. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

The post घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.