छगन भुजबळांच्या राजकिय खेळीकडे सर्वांचे लक्ष, कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

छगन भुजबळ

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे.

नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या माघारीनंतरही पक्षाने नाशिकच्या जागेवर दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतला आहे. नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित नाही. महायुतीतील तीनही पक्षांनी या जागेवर दावा दाखल केला आहे. असे असतानाही  महायुतीतील नेत्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी यासाठी समता परिषदेने नाशिकमध्ये ठराव केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीत भुजबळांची मनधरणी करण्यात येईल असा ठराव झाल्याने भुजबळ काय भूमिका घेतात हेही पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूकीत शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून गुरुवारी (दि.२५) बैठक घेण्यात आली. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा ठराव करत उमेदवारीसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा व त्यात यश न आल्यास सर्वसंमतीने पक्षाचाच एक उमेदवार निश्चित करून अर्ज दाखल करण्याचा निर्णय राष्ट्रवादी भवनात झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा –