मादी बछड्याचा अडीच महिन्यांपासून वनविभागात मुक्काम, पुण्याची रेस्क्यू संस्था करतेय देखभाल

leopard news www.pudhari.news

गंगापूर रोड : आनंद बोरा

येवल्यापासून जवळच असलेल्या कोटमगावमध्ये एका शेतात वनविभागाला १३ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा दोन महिन्यांचा मादी बछडा आढळून आला होता. वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपद्धतीनुसार ती सापडली, त्याच ठिकाणी पाच रात्र ठेवूनही आई न आल्याने अखेर बछड्याला नाशिकला आणण्यात आले. अडीच महिन्यांपासून पुण्याची रेस्क्यू संस्था आणि नाशिक पश्चिम वनविभागाचे अधिकारी तिचा सांभाळ करीत आहेत.

एका छोट्या पिंजऱ्यात राहणारा हा मादी बछडा असून, तिचे नाव ‘परी’ ठेवण्यात आले. ही परी आता सर्वांची लाडकी बनली आहे. जेव्हा तिला नाशिकमध्ये आणण्यात आले, तेव्हा ती खूप अशक्त होती. तिला ताबडतोब वैद्यकीय उपचार देण्यात आले. रेस्क्यू टीमने या बछड्याची माहिती कॅप्टीव्ह वाइल्ड लाइफ मॅनेजमेंट या सिस्टीमवर टाकली. यामुळे राज्यातील सर्व वन अधिकाऱ्यांनादेखील याची माहिती दिली गेली. या संस्थेचे डॉ. हेमराज सुकवाल हे तिची दैनंदिन तपासणी करतात. संस्थेचे कार्यकर्ते वैभव भोगले, अभिजित महाले, समर्थ महाजन, आयुष पाटील, राकेश मोरे हे त्याचा सांभाळ करीत आहेत. रोज सकाळी फीडिंग केले जाते. सुरुवातीला इम्पोर्ट फूड फाॅम्र्युला दिला जायचा. आता ही परी मांस खायला लागली आहे. रोज तिच्याकडून व्यायामदेखील करून घेतला जातो. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी परीच्या पिंजऱ्यासमोर कूलरचीदेखील व्यवस्था केली आहे. असे जरी असले तरी दुसऱ्या बाजूला या बछड्याला पुन्हा जंगलात सोडता येणार नसल्याने तिची कायमस्वरूपी व्यवस्था प्राणिसंग्रहालय किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये करावी लागणार आहे. राज्यातील सर्व रेस्क्यू सेंटर व प्राणिसंग्रहालय वन्यप्राण्यांनी भरलेले असल्याने परीला कुठेच जागा नसल्याचे कळते. मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिला ठेवण्याविषयी प्रयत्न सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हसरूळमध्ये

             नाशिकमध्ये जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर असावे, ही वन्यजीवप्रेमींची मागणी तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता अखेर संपुष्टात आली आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या दोन एकर जागेपैकी एक एकरमधील उपचार केंद्राचे अद्ययावत बांधकाम पूर्ण झाले असून, हे एप्रिल महिन्यात सुरू होणार होते. परंतु, त्यास विलंब होत आहे. अनेक वन्यप्राणी जखमी होत असल्याने उपचारानंतर त्यांना सांभाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक रेस्क्यू सेंटर होणे आवश्यक आहे. यासाठी वनविभागाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

या बछड्याला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिले जाणार आहे. सध्या त्यांच्याकडे जागा नसल्याने काही दिवस आम्हालाच त्याला सांभाळावे लागणार आहे. सध्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवून त्याची काळजी आम्ही घेणार आहोत. तो माणसाळू नये याची दक्षता घेत आहोत.

-वृषाली गाडे, वन परिक्षेत्र अधिकारी, पश्चिम विभाग