जखमी पक्ष्यांना नवी भरारी देणारी नांदूरची ‘आक्का’

नांदुरची आक्का www.pudhari.news

नाशिक: आनंद बोरा

निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर 1913 साली नांदूरमध्यमेश्वर धरण बांधण्यात आले. या धरणाचे बॅक वॉटर मांजरगाव, चापडगावपर्यंत आहे. पाणवनस्पती, कीटक, शिंपल्यांमुळे या परिसरात पक्ष्यांची संख्या विपुल प्रमाणात बघावयास मिळते. रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात पाखरे वाचविणारी ‘नांदूरची आक्का’ हे नावदेखील प्रसिद्ध आहे.

या अभयारण्याच्या बाजूला चापडगाव हे गाव आहे. या गावातील लताबाई लोखंडे ऊर्फ आक्का गेल्या ५० वर्षांपासून पक्षी अभयारण्य परिसरात गुरे चारायचे काम करीत आहेत. अभयारण्याची सुरुवात होण्याअगोदर आक्का पक्षी संवर्धनाचे काम करीत आहेत. त्याचा मुलगा शंकर आईच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षी अभयारण्यात गाइड म्हणून काम करीत आहे. दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आक्काने ५० वर्षांत शेकडो जखमी पक्ष्यांना जीवदान दिले. करकोचे, गार्गणी, ब्राह्मणी बदक आदींसह दुर्मीळ होत चाललेले गिधाडदेखील आक्काने वाचविले. एक रोहित पक्षी अभयारण्यात जखमी दिसल्यानंतर आक्काने तो पक्षी खांद्यावर उचलून घरी आणला होता. हळदी कुंकू, जांभळी पाकोंबडी, वारकरी आणि कमळ पक्ष्यांची अंडी संरक्षित करण्याचे काम त्यांनी केले आहे.

धरणामध्ये त्याकाळी मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांना मुक्त करण्याचे काम त्या करत. धनगर, मेंढपाळ व ऊसतोड कामगारांच्या मुलांना गलोल वापरू नये, यासाठी जनजागृतीदेखील केलेली आहे. गुरे चारताना त्या वनविभागाच्या बिनपगारी वनरक्षक बनत असत. अभयारण्य वाचविण्यासाठी इतके परिश्रम घेणाऱ्या आक्काच्या कामाची नोंद कुणीही घेतली नाही. असे असले तरी आज सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या आक्का पक्षी संवर्धनाचे काम आजही करत आहेत.

जनावरांना बंदीमुळे पक्षीसंख्येत घट

२० वर्षांपूर्वी अभयारण्यात ५० हजार पक्षी बघावयास मिळायचे. त्यावेळी गावातील गुरे धरणाच्या पाण्यात जाऊन चारा खात होती. जेथे प्राणी असतात तेथे पक्षीदेखील राहतात. गावरान गायीच्या अंगावरील गोचीड पक्षी खातात. पण आता वनविभागाने जनावरांना बंदी केल्याने पक्ष्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

कमळ, अन्य वनस्पती वाचविण्यात यश

पक्षी अभयारण्यातील कमळ बेटावरील कमळाचे कंद घेण्यासाठी आयुर्वेद उत्पादक यायचे. अशावेळी आक्काने त्यांना कमळ कंद नेण्यास विरोधदेखील केला होता. अभयारण्यात वणवा लागल्यावर गावकऱ्यांना बोलावून वणवा विझविण्याचे कामदेखील केले आहे.

————

गेल्या ५० वर्षांपासून मी पक्षी अभयारण्य बघत आहे. १० वर्षांपूर्वी या परिसरात पक्ष्यांची संख्या जास्त होती. पण गुरे चरण्यास बंदी केल्यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. गावात देखील पाळीव जनावरे खूपच कमी झाली आहेत. आधुनिक यंत्र वापरामुळे देखील पक्षी या परिसरात येत नाही

– लताबाई लोखंडे

हेही वाचा –