१७ लाखांच्या लुटीमागे कामगारच सूत्रधार, पाच संशयित ताब्यात

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- घाऊक व्यापाऱ्याकडील सुमारे १७ लाखांची रोकड लूटप्रकरणाचा उलगडा ४८ तासांत करण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, व्यापाऱ्याकडे कामाला असणाऱ्या दोघांनीच हे षडयंत्र रचल्याचे उघड झाले. पाच संशयितांना अटक झाली असून, त्यात तिघे सराईत गुन्हेगार आहेत. १४ लाख ३२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट एकने हस्तगत केला आहे.

पवन मोहनलाल लोढा (४२, रा. किशोर सूर्यवंशी मार्ग) यांचे शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये आदिनाथ ट्रेडिंग कंपनी हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकानातील हिशेबाची रक्कम घेऊन त्यांचे नातेवाईक दिलीप छाजेड (६०) हे दुचाकीने घरी चालले होते. तेव्हा आरटीओ कार्यालयाजवळील वजन काट्यालगत लूटमार होऊन त्यांची १६ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट एकने समांतर तपास केला. पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व खबऱ्यांकडून माहिती घेतली. शु्क्रवारी (दि. १९) गुन्ह्यातील संशयित आरोपी शनिमंदिर, पेठ रोड येथे येणार असल्याची माहिती हवालदार विलास चारोस्कर, राजेश राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित संदेश सुधाकर पगारे उर्फ काळ्या याला दुचाकीसह (एमएच १५, एफजी २५१२) ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने सागर सुधाकर पगारे, माऊ उर्फ वैभव गांगुर्डे, अतुल सय्यद, असलम सय्यद यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या वाट्याला आलेली रोख रक्कम नऊ लाख ४९ हजार ८३० रुपये, व्हिजिटिंग कार्ड, पाकिटे, एचडीएफसी बँकेचे चेकबुक असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्या.

याच दरम्यान अंमलदार आप्पा पानवळ यांना या गुन्ह्यातील संशयित फुलेनगरजवळील पाटाजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती. पथकाने सापळा रचून संशयित अतुल सुरज सय्यद व असलम गफूर सय्यद यांना दुचाकी (एमएच १५, बीसी ४२७७), मोबाइल फोन, पाकीट, रोकडसह ताब्यात घेण्यात आले. एकूण आरोपींकडून १३ लाख ९४ हजार ८३० रुपयांच्या रोकडसह १४ लाख ३२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी दुकानातच काम करणारे

संशयित अतुल सय्यद, असलम सय्यद हे पवन लोढा यांच्या दुकानात कामाला होते. त्यांना दुकानातील दैनंदिन कामकाजाची व व्यवहाराची माहिती होती. त्याचाच फायदा घेत आणखी काही संशयितांना बरोबर घेत रेकी करत व त्यांनी दुकानातून रोकड निघाल्याची टीप दिली. पोलिसांनी ठिकठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तपासात अतुल सय्यद, असलम सय्यद यांची कसून चौकशी केली असता, घटनेचा उलगडा झाला.

हेही वाचा –