जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव दूध संघ निवडणूक विश्लेषण,www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणुकीचे धक्कादायक निकाल आले आहेत. खडसे यांचा गड असलेल्या दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरातून खडसे यांच्या विरोधात उमेदवारी करून विजय मिळवला. यामुळे आ. खडसे यांना मोठा झटका बसला आहे.

या विजयामुळे ना. महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांना आगामी निवडणुकांसाठी यशाची संधी असल्याचे बोलले जात आहे. तर आ. खडसे यांची राजकीय वाटचाल खडतर होण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. त्यात माजी मंत्री खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने सहकारात राष्ट्रवादीची ताकद वाढणार अशी शक्यता असतानाच दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. या विजयामुळे ना. महाजन व पालकमंत्री पाटील यांना ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मोठे आव्हान असणार आहे.

गैरव्यवहाराचा मुद्दा ठरला कळीचा…

राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन होताच जिल्हा दूध संघात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर आमदार चव्हाण यांनी दूध संघातील सात वर्षांतील मंदाकिनी खडसे यांच्या कारकीर्दीतील नोकरभरतीसह गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढली. यामध्ये खडसे यांचे विश्वासू असलेल्या चार अधिकाऱ्यांना यात अटकही झाली. यामुळे आ. खडसे यांच्यासाठी हा पहिला हादरा ठरला. या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संचालक मंडळावरील विश्वास डगमगला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नवा पर्याय शोधत दूध राज्यात भाजप-शिंदे गट प्रणीत शेतकरी विकास पॅनलला संधी दिली आहे.

परिवारवादाचा मुद्दा पडला महागात…

फडणवीस सरकारच्या काळात १२ खात्यांचे मंत्री असतानाही खडसेंनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मुलगी ॲड. रोहिणी खडसे यांना तर दूध संघाचे अध्यक्षपद पत्नी मंदाकिनी खडसेंना दिले. त्यामुळे स्वपक्षातही त्यांच्याविषयी भाजपात मोठी नाराजी होती. राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्हा बँक निवडणुकीत चेअरमनपदासाठी अ‍ॅड. रोहिणी खडसेंना पुढे करून राष्ट्रवादीतील प्रस्थापित नेत्यांची नाराजी खडसेंनी ओढवून घेतली होती. तेव्हा तर मराठा विरुध्द लेवा असा सामाजिक वाद उभा राहिला होता. यातूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पॅनलचा प्रचार न करता वैयक्तिक प्रचारावर भर दिल्याची चर्चा आहे. गिरीश महाजन यांनीही याच मुद्द्यावरून खडसेंवर हल्ला चढवला होता.

जिल्हा बँकेवर होणार परिणाम…

राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत सहकार पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे मोठ्या फरकाने पराभूत झाल्या. असे असताना पक्षातील चार उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. तर राष्ट्रवादीच्या एकूण ९ उमेदवारांना मंदाकिनी खडसेंपेक्षा अधिक म्हणजे २०० पेक्षा अधिक मते आहेत. त्यामुळे खडसेंना पक्षातून सहकार्य झाले नसल्याची बाब पुढे येत असून, खडसे जिल्हा बँकेत अध्यक्ष बदलाचा प्रयोग करू शकतात.

लोकसभेचे गणित बिघडणार…

यावल आणि रावेर तालुका खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. दूध संघात भाजपच्या विजयाचे सर्वात प्रभावी केंद्र हे दोन तालुके ठरले. खडसेंच्या पॅनलला सुरूंग येथूनच लागल्याने हा भाग खडसेंचा नव्हे तर भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दिसून आले. त्याचे परिणाम, आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येतील.

हेही वाचा :

The post जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा ! appeared first on पुढारी.