सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा

खासदार हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सारथी संस्थेला विभागीय कार्यालयासाठी नाशिक शहरात सहा हजार चौरस फूट जागा शासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर याचे श्रेय लाटण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या या कृतीमुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी असून, त्यांच्याकडून केला जात असलेला हा खटाटोप केवळ मराठा समाजाच्या मतांची झोळी भरण्यासाठी असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या कोणत्याही आंदोलनात निरपेक्ष सहभाग न नोंदविणारे, या आंदोलनाचे गुन्हे अंगावर घेतलेल्या तरुणांना वार्‍यावर सोडणारे, स्वत:वर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून चार हात लांब राहणारे खासदार गोडसे हे समाजाच्या नावाने राजकारण करीत आहेत. सारथीसारख्या संस्थेच्या जागेचे फुकटचे श्रेय घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा आहे. खासदार गोडसे यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये किती वेळा भूमिका मांडली? ती त्यांनी समाजापुढे आणावी. मराठा समाजाचे नाशिकमध्ये झालेल्या आंदोलनात, उपोषणात ते किती वेळा सहभागी झाले याचेही पुरावे द्यावेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून किती आंदोलनात ते सहभागी झाले याचेही त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहनही गायकर यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे. सारथी शिक्षणसंस्था ही नाशिक विभागास मिळाली हे पूर्णपणे मराठा क्रांती मोर्चाचे व छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे.

ते कोण्या एका व्यक्तीचे यश नसून, संपूर्ण समाजाचे आहे. त्यामुळे खासदार गोडसे यांनी फुकटच्या श्रेयासाठी खटाटोप करू नये. त्यांनी त्यांचे राजकारण खुशाल करावे, परंतु समाजाची दिशाभूल करू नये, असेदेखील गायकर यांनी म्हटले. दरम्यान, यासंदर्भात खा. गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता संवाद होऊ शकला नाही.

हेही वाचा :

The post सारथी’च्या जागेचे फुकटचे श्रेय लाटू नका, खा. हेमंत गोडसे यांना छावा क्रांतिवीर सेनेने दिला इशारा appeared first on पुढारी.