जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

sharad pawar NCP शरद पवार
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत भाजप आहे. मध्यप्रदेशात देखील आहे. परंतु मध्य प्रदेशात भाजपचं राज्य नव्हतं. तिथे कमलनाथ यांचे सरकार होते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. गोव्यात काँग्रेस होती. त्यांनी आमदार फोडले. खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, असेही त्यांनी सांगितले.
देशपातळीवरही परिवर्तन होणार…
बहुसंख्य राज्यात लोकांनी भाजपला नाकारले आहे. त्यामुळे आता लोक देशपातळीवरही वेगळा विचार करतील असे वाटते. असे असेल तर एकत्र बसून सर्वांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या इच्छांची पूर्तता केली पाहिजे. देशात शेतीमालास भाव नाही, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर परिवर्तन हाच त्यावर पर्याय आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
वंचित आघाडी भाजपची ‘बी’ टीम…
काही वेळेला राजकारणात स्वत: लढायचं असते. दुसरे म्हणजे पायात पाय घालण्यासाठी एक-दोन समुह तयार करायच्या असतात. त्याला साधारणत: ही राजकारणाची ‘बी’ टीम म्हणतात. मागच्या निवडणुकीत आम्हाला नुकसान सहन करावे लागले होते. वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला ते नुकसान सहन करावे लागले होते, अशा शब्दांत शरद पवारांनी वंचित आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.