जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा

जिल्हाधिकारी जलज शर्मा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहे. पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे. टंचाईच्या परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आठवड्याभरात आढावा बैठक घेण्याचे संकेत दिले आहेत. बैठकीमध्ये टंचाई निवारणाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता असल्याने जनतेच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत.

चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाण्यासाठी जनतेची भटकंती होत आहे. दुष्काळाची झळ लक्षात घेता पालकंमत्री दादा भुसे यांनी दहा दिवसांपूर्वीच टंचाई उपाययोजनांबाबत बैठक बोलविली. पण, जिल्ह्यातील पंधरापैकी तब्बल १३ आमदारांनी बैठकीला दांडी मारली. त्यामुळे मंत्री भुसे यांच्यावर बैठक स्थगित करण्याची वेळ ओढावली होती. तसेच लवकरच नव्याने बैठक घोषणाही त्यांनी केली होती. परंतु दहा दिवसांनंतरही या बैठकीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस टंचाईचा दाह अधिक गडद बनत चालला आहे. पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने जनतेला टँकरवरच अवलंबून राहावे लागते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांनी येत्या आठवड्यात तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांसह अन्य संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीमध्ये टंचाईची स्थिती व भविष्यातील करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या जनतेला लवकरच दिलासा मिळू शकतो.

टँकरचा फेरा वाढणार

फेब्रुवारीच्या मध्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ४९ टक्के म्हणजेच ३२ हजार ३९० दलघफू साठा शिल्लक आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत ४३६ गावे-वाड्यांना १३३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातोय. त्यासाठी शासनाने टँकरच्या २९० फेऱ्या दिवसाला मंजूर केल्या असून, प्रत्यक्षात २८६ फेऱ्या होत आहेत. उन्हाचा तडाखा जसाजसा वाढेल, त्यानुसार टँकरच्या फेऱ्यांतही वाढ होणार आहे. दरम्यान, प्रशासनाच्या अंदाजानुसार एप्रिल-मेपर्यंत टँकरची संख्या ३७५ वर पोहोचू शकते.

हेही वाचा :

The post जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा, जिल्हाधिकारी घेणार आढावा appeared first on पुढारी.