जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

जे. पी. गावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले जे. पी. गावित यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर एकही रुपयाचे कर्ज नसून न्यायालयात दाखल विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

गावित यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद काॅलेजमधून १९७४ साली एसवायबीएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. गावित यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता २ कोटी ३६ लाख ४० हजार ८०१ रुपये दाखविली आहे. त्यामध्ये पत्नीच्या नावे ६ लाख ५७ हजार मूल्याची जंगम मालमत्ता आहे. तसेच स्थावर मालमत्तेमध्ये १ कोटी ७ लाख १३ हजार ७०० आणि ४१ लाख २५ हजार ५०० रुपायांची अशा दोन मालमत्ता त्यांच्या नावावर आहेत. अंधेरी, नाशिक, अलंगुण, मरोळ (मुंबई) येथे त्यांची घरे असून त्याचे मूल्य १ कोटी ७ लाख १३ हजार ७०० आहे. त्यांच्या नावे एक इनोव्हा कार तसेच ट्रॅक्टर असून, १ लाख १० हजारचे सोने-चांदीचे दागिने आहेत.

गावित यांच्याकडे बँक खात्यात ५ लाख रुपये रोख रक्कम, तर त्यांच्या पत्नीच्या खात्यात १० हजार रक्कम आहे. त्यांच्या बँकेतील ठेवींमध्ये देना बँक सुरगाणा ६ लाख ६८ हजार ३२४, एनडीसीसी बँक उंबरठाण ५ लाख ६८ हजार ४१२, एनडीसीसी बँक सुरगाणा ४ लाख ८० हजार २७५ रुपये, एसबीआय सुरगाणा ९२ लाख ७० हजार २९५ रुपये, बँक ऑफ बडोदा सुरगाणा ९ लाख १७ हजार ४१६, पंजाब नॅशनल बँक उंबरठाण ६ लाख २३ हजार ६५०, कॅनरा बँक, अंधेरी ५७ लाख ९८ हजार ४४२, स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई २१ लाख १९ हजार १२७ तर त्यांच्या पत्नीच्या नावे एनडीसीसी बँक सुरगाणा ४ लाख ५ ७ हजार आणि बँक ऑफ बडोदामध्ये १ लाख ९० हजार २३९ रुपयांच्या ठेवी आहेत.

गावितांच्या संपत्तीत वाढ

२०१९ च्या निवडणुूकीत गावित यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात २ कोटी २२ लाख २८ हजार ८९२ रुपयांची संपत्तीची नोंद केली होती. पाच वर्षांनंतर त्यांच्या संपत्तीचे मूल्य एकूण ४ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. मागील निवडणुकीत त्यांच्यावर ६ लाख ८३ हजार ३६५ रुपयांचे कर्ज होते. जे यंदाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाची एकही रुपया नसल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा –